आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीर चर्चेवरून ब्रिटनमध्ये वादंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - ब्रिटनच्या संसदेतील कमिटी रूममध्ये काश्मीरमधील राजकीय स्थिती मानवी हक्काच्या मुद्द्यावर गुरुवारी चर्चा होणार आहे. मात्र, या प्रकाराबद्दल भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लंडन येथील भारतीय दूतावासाने ब्रिटनकडे या चर्चेबाबत आक्षेप नोंदवला आहे.

या चर्चेचा विषय आणि त्यातील मुद्दे यांची अधिकृतरीत्या नोंद केली जाईल. लिबरल डेमॉक्रेटिक पक्षाचे खासदार डेव्हिड वॉर्ड यांनी या चर्चेची मागणी केली आहे. वॉर्ड हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ब्रॅडफोर्ड ईस्टचे प्रतिनिधित्व करतात. ब्रॅडफोर्ड सिटी या ब्रिटनमधील भागात पाकिस्तानी नागरिक सर्वाधिक संख्येने राहतात. त्यामुळे त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी हा मुद्दा उपस्थित केल्याचे म्हटले जात आहे. ब्रॅडफोर्ड यांच्यासह त्या भागातील काही खासदारांनी याआधीदेखील काश्मीरच्या मुद्द्यावरून संसदेत चर्चेसाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. संसदेत काश्मीरच्या मुद्द्यावर चर्चेसाठी जम्मू काश्मीर सेल्फ डिटर्मिनेशन मूव्हमेंटने नोटीस दिली होती. संघटनेने केलेल्या अर्जावर पाच हजार लोकांच्या स्वाक्षर्‍या आहेत. गुरुवारी होणार्‍या चर्चेत २० खासदार सहभागी होणार आहेत.

भारतविरोधी वातावरणाचा प्रयत्न : ब्रिटिशमीडियाच्या अहवालानुसार भारताने ब्रिटनच्या खासदारांची ही कृती काश्मीरबाबत त्यांच्या भूमिकेच्या टीकेचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. लिस्टेटर येथील ब्रिटिश हिंदू व्हॉइस या संघटनेने खासदारांना अावाहन केले आहे, भारतीय वंशाच्या लोकांच्या चिंतेवर लक्ष द्या. या चर्चेचा उद्देश ब्रिटनमध्ये भारतविरोधी वातावरण तयार करणे हा आहे. ब्रिटनमधील भारताचे उपउच्चायुक्त वीरेंद्र पॉल यांनीही गुरुवारी होणार्‍या चर्चेवर आक्षेप घेतला आहे.

समाजातील काही घटक दोन्ही देशांचे संबंध मजबूत व्हावेत या मताचे नाहीत. त्यांना त्यात फूट पाडायची आहे. त्यासाठीच त्यांनी काश्मीरवरील चर्चेचे हे अनावश्यक प्रकरण बाहेर काढले आहे.

४०० पाकिस्तानी व्यापार्‍यांना भारताचा व्हिसा
इस्लामाबादेतील भारतीय उच्चायुक्तालयाने पाकिस्तानातील ३५० ते ४०० व्यापार्‍यांना भारतीय व्हिसा जारी केला आहे. राजधानी दिल्लीत प्रगती मैदानावर ११ ते १४ सप्टेंबरदरम्यान होणार्‍या दुसर्‍या ‘लाइफस्टाइल पाकिस्तान’ या प्रदर्शनात हे व्यापारी सहभागी होणार आहेत. गेल्या एक महिन्यापासून या व्यापार्‍यांनी व्हिसासाठी भारतीय दूतावासाकडे अर्ज केले होते. परंतु तणावपूर्ण स्थितीमुळे त्यांना व्हिसा देण्यात आला नव्हता. पोलिस अहवालानंतर तात्पुरता व्हिसा देण्यात आला आहे. पाच कोटींवर उलाढाल असलेल्यांना पोलिस अहवालातून सूट देत व्हिसा देण्यात आला. ट्रेड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी ऑफ पाकिस्तान फिक्कीने संयुक्तरीत्या हे प्रदर्शन ठेवले आहे.