आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आहाराच्या नियंत्रणाखाली कधीही राहू नका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ती माझ्याकडे रडत रडत आली आणि म्हणाली की, दररोज व्यायाम करूनही वजन कमी होत नाही. हल्ली तिला आरशात पाहायलाही आवडत नाही. ही गोष्ट आहे पूजाची. पूजाची ही समस्या अकरावीला असताना सुरू झाली. ती अभ्यासात हुशार होती. मात्र, इतर विद्यार्थ्यांच्या सतत पुढे राहण्याच्या अपेक्षेमुळे ताण वाढत गेला. जास्त वजन असल्याने मुले तिला चिडवतही होती. भावा-बहिणींशी तुलना केल्यानंतर तिला अपयशी झाल्यासारखे वाटत होते. पूजाने डाएटिंग सुरू केले व दहा किलो वजन कमी केले. ‘फील गुड’ फॅक्टरमुळे तिचे आहारावरचे लक्ष वाढत गेले. आता ती खूप उत्साहात असते किंवा तणावाखाली असते तेव्हा तिला भूक लागते.

तिची आहाराविषयीची संकल्पना ‘इटिंग डिसआॅर्डर’मध्ये बदलली आहे. ‘अन्न’ आणि ‘वजन कमी करणे’ हे शब्द तिच्या व्यक्तिमत्त्वाशी जोडले गेले आहे. पूजाला अ‍ॅनोरेक्सिया नर्व्होसा हा आजार जडला. या आजाराची सुरुवात डाएटिंगपासून होते. मानसिक ताण, टेन्शन, भांडण-तंटे यामुळे आहार अनियंत्रित होतो. आजवर या आजाराचे योग्य कारण सापडले नाही. हा आनुवंशिक, पर्यावरणसंबंधित आणि मेंदूतील गुंतागुंतीचा आजार आहे. अ‍ॅनोरेक्सिया आजार झालेल्या मुली लहानपणापासूनच उत्साही किंवा माथेफिरू असतात. कुमारवयात हार्मोनल चेंजेस आणि सोशल चॅलेंजमुळे डाएटिंग केल्यास मेंदूमध्ये बदल होतो. यामुळे आजार वाढू व बळावू लागतो. अनेकदा पालकांना आणि शिक्षकांना डाएटिंग आणि इटिंग डिसआॅर्डरदरम्यानचा फरक समजणे कठीण जाते. डाएटिंगमध्ये लोक निरोगी पद्धतीने वजन कमी करतात. इटिंग डिसआॅर्डरमध्ये वजन कमी करण्यासाठी आहार आणि तो घेण्याच्या सवयी आपल्या शरीरावर नियंत्रण मिळवू लागतात. कमी खाण्याऐवजी जास्त खाणे किंवा न खाणे. खाल्ल्यानंतर बाथरूममध्ये जाऊन उलटी करणे. जास्त खाल्ल्यानंतर आरशात पाहणे किंवा पाचक गोळ्या खाणे ही अ‍ॅनोरेक्सिया नर्वोसा या आजाराची काही लक्षणे आहेत.