आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डायनॉसोरचे एक कोटींचे अंडे धारमधील गावकरी विकताहेत फक्त 500 रुपयांना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मांडला- मूळातच दुर्मिळ असलेला आणि जगातून केव्हाच नष्ट झालेला महाकाय डायनॉसोरच्या एका अंड्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात एक कोटी रुपये आहे. मात्र याच डायनॉसोरची अंडी मध्यप्रदेशात अक्षरश: कवडीमोल भावाने विकली जात आहेत. मध्य प्रदेशातील धार-मांडला या भागातील गावकरी हे अंडं तस्करांना केवळ 500 रुपयांना विकतात. कारण त्यांना हेच माहित नाही की हे अंडे आहे कशाचे आणि याचे करायचे काय?. त्यापेक्षा अशा एका अंड्याला आपल्याला 500 रुपये मिळतात याचे जास्त अप्रूप वाटते.

मध्य प्रदेशातील धार-मांडला हा पट्टा जीवाश्मसंपन्न प्रदेश आहे. येथील सुमारे 100 हेक्टरच्या पट्ट्यात अशी अंडी सापडत आहेत. डायनॉसोरच्या अंड्यांना जगभरातील जीवाश्म तज्ज्ञांकडून, आंतरराष्ट्रीय संस्थाकडून मागणी असते. त्यासाठी ते कोट्यावधी रुपये खर्च करतात. मात्र येथील गावक-यांना या अंड्यांचे महत्त्व आणि पुरातत्वीय मूल्य माहित नाही. त्यामुळे महाराष्ट्र, गुजरात आदी आसपासच्या राज्यातील आंतरराष्ट्रीय तस्करी करणारे लोक या गावक-यांच्या हातावर अवघे 500 रुपये टेकवतात व ही अंडी लंपास करतात. बरं आपल्याला एका अंड्याला 500 मिळाले म्हणून गावकरी खूष होतात व पुन्हा अंडी शोधण्यासाठी शोधाशोध करतात.