आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरियावर मुत्सद्देगिरीने तोडगा काढण्‍याचा निर्णय - बराक ओबामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - रासायनिक हल्ल्याबद्दल लष्करी कारवाई करून असाद सरकारला धडा शिकवण्याचा इरादा अमेरिकेने तूर्त बाजूला ठेवला आहे. सिरिया पेचप्रसंगावर मुत्सद्देगिरीने तोडगा काढण्याचा निर्णय अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी जाहीर केला. त्याचबरोबर सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद आपला शब्द पाळतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. मात्र, रासायनिक अस्त्रे नष्ट करण्याविषयी बोलणी फिसकटल्यास अमेरिका हल्ला करेल, असा इशाराही असाद सरकारला देण्यात आला असून लष्कराला सज्ज राहण्याचे आदेश ओबामांनी दिले आहेत.


व्हाइट हाऊसच्या ईस्ट रूममधून मंगळवारी ओबामांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले. देशवासीयांचा विरोध आणि लष्करी कारवाईच्या विधेयकास काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांत पाठिंबा मिळण्याची शक्यता नसल्याने ओबामांच्या चेह-यावर निराशा स्पष्टपणे दिसत होती. सिरियाची रासायनिक अस्त्रे आंतरराष्ट्रीय निगराणी व नियंत्रणाखाली ठेवण्याचा रशियाचा प्रस्ताव उत्साहवर्धक असल्याचे वर्णन त्यांनी केले. ओबामांनी 16 मिनिटे भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी यासंदर्भात चर्चा केल्याचेही सांगितले. लष्क री कारवाईचे सर्वाधिकार देणा-या विधेयकावरील मतदान पुढे ढकलण्याची विनंतीही त्यांनी या वेळी सिनेटला केली.


पोलिस नव्हे, सुरक्षेचा आधारस्तंभ
> अमेरिका म्हणजे जगाचा पोलिस नव्हे, तर जागतिक सुरक्षेचा भक्कम आधारस्तंभ आहे. जगात अनेक भयंकर गोष्टी घडत आहेत. प्रत्येक चूक सुधारणे शक्य नाही.
> थोडेसे प्रयत्न आणि जोखीम उचलून आपण विषारी वायूमुळे मृत्युमुखी पडणा-या मुलांचे
प्राण वाचवू शकतो. त्यावर आपल्या मुलांचीही सुरक्षा अवलंबून आहे. त्यासाठी जनतेचा पाठिंबा हवा आहे.
> असाद यांच्यावर दबाव कायम ठेवण्यासाठी लष्करानेही कायम सतर्क राहावे. मुत्सद्देगिरी निष्फळ ठरल्यास लढाईसाठी तयार राहा.


सुरक्षा परिषदेत प्रस्ताव
असाद यांनी दडवलेली रासायनिक अस्त्रे आंतरराष्ट्रीय निगराणीखाली आणून नंतर ती नष्ट केली जातील. यासाठी रशिया, चीनशी सल्लामसलत करून अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स ही दोस्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेत प्रस्ताव मांडणार आहेत.


इराणलाही गर्भित इशारा
सिरियाप्रकरणी सामोपचाराची भाषा करतानाच ओबामांनी सिरियाचा घनिष्ठ मित्र इराणलाही गर्भित इशारा दिला. इराणच्या अणुकार्यक्रमाचा उल्लेख करून ते म्हणाले, आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करायचे की शांततेच्या मार्गाचा अवलंब करायचा हे आता इराणनेही ठरवायला हवे.


केरी-लाव्हारोव आज भेट
सिरियाप्रकरणी तोडगा काढण्यासाठी अमेरिकी परराष्ट्रमंत्री जॉन केरी उद्या गुरुवारी जिनेव्हाला जाणार आहेत. तिथे रशियन परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हारोव यांच्याशी ते चर्चा करतील.