फोटो - तालिबानने जारी केलेला हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा फोटो
पेशावर - पाकिस्तानच्या पेशावरमध्ये केलेल्या हल्ल्यात निष्पाप आणि निरागस बालकांचे प्राण घेणारे दहशतवादी एवढे क्रूर होते की, त्याची कोणाशीही तुलना करणे शक्य नाही. घटनेदरम्यान त्यांच्यात झालेल्या चर्चेतून या क्रौर्याचा अंदाज येतो. पाकिस्तानी गुप्तचर संस्थांनी या दहशतवाद्यांच्या विरोधात राबवलेल्या तपास अभियानामध्ये जे फोन कॉल इंटरसेप्ट करण्यात आले, त्यावरून दहशतवाद्यांनी त्यांच्या म्होर-यांबरोबर केलेल्या चर्चेचा खुलासा झाला आहे.
एका पाकिस्तानी पोलिस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार शिक्षक आणि मुलांवर अंधाधुंद गोळीबार करून त्यांना मृत्यूशय्येवर पोहोचवणा-या दहशतवाद्यांपैकी एकाने म्होरक्याला फोन केला होता. अबूजार नावाचा हा दहशतवादी त्याच्या हँडलरला (म्होरक्या) म्हणाला, आम्ही ऑडिटोरियममधील सर्व मुलांना मारून टाकले आहे. आता पुढे काय करायचे आहे? त्यावर समोरच्या व्यक्तीने उत्तर दिले की, सैन्याची वाट पाहा आणि त्यांनाही मारून टाका. त्यानंतर स्वतःला उडवून टाका.
तालिबानच्या हल्ल्याची किंमत मोजणा-या पाकिस्तानात सगळीकडे रोषाचे वातावरण आहे. सर्वत्र दुःखाची चादर पसरलेली आहे. तीन दिवसांच्या राष्ट्रीय दुखवट्याची घोषणा करण्यात आली असून, सरकारी कार्यालयावरील झेंडे अर्धे खाली झुकलेले आहेत. व्यवसायावरही अत्यंत वाईट परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. बुधवारी दिवसभर तर मृतांच्या अंत्ययात्रा निघत होत्या.
पालकांची लष्कराला विचारणा, कुठे आहे अॅटम बॉम्ब?
मुले गमावल्याचे दुःख सोसणा-या सर्वच पालकांची रडून रडून अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.
आपल्या नातवाचा मृतदेह स्वीकारण्यासाठी रुग्णालयात गेलेल्या एका व्यक्तीने विचारले की, लष्कराचे अॅटम बॉम्ब आणि फायटर जेट कुठे आहेत? आमच्या मुलांना वाचवण्यात त्यांना यश आले नाही मग, आता त्यांचे काय काम?
लष्कराला दुःख
लष्कराच्या एका अधिका-याने या प्रकरणी दुःख व्यक्त करताना सांगितले की, शाळेच्या प्रशासनाने ऑगस्ट महिन्यामध्येच तालिबानच्या हल्ल्याची शक्यता वर्तवली होती. काही शिक्षकांनी तर खुलेपणाने म्हटले होते की, शाळेच्या भींती हल्ले रोखण्यात सक्षम नाहीत. पण एवढी माहिती मिळूनही काहीही, झाले नाही.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTO