आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divers Struggle In Search For South Korean Ferry Survivors

जहाजातून 179 जणांना वाचवले; दुर्घटनेत 5 विद्यार्थ्यांसह नऊ जणांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिओल - ‘सेंडिंग धिस इन केस आय मे नॉट बी एबल टू से धिस अगेन.. मॉम आय लव्ह यू’ (हा संदेश यासाठी पाठवत आहे की, पुन्हा कधी म्हणू शकेन अथवा नाही. मॉम... मी तुझ्यावर खूप प्रेम करतो...) फोनवर हा संदेश एक विद्यार्थी शिन यंग जिन याने बुडालेल्या जहाजातून आपल्या आईला पाठवला आहे. तो आपल्या शालेय मित्रांसोबत तसेच शिक्षकांसोबत पिकनिकसाठी ब्युंगपुग बेटावर (दक्षिण कोरिया) जात होता. आईने उत्तर दिले की, ‘ओह, आय लव्ह यू टू सन.’ परंतु तिला याची पुसटीशीही कल्पना नव्हती की मुलगा किती मोठ्या संकटात सापडला आहे.

दक्षिण कोरियातील जिंडो समुद्रात बुधवारी एका प्रवासी जहाजाला जलसमाधी मिळाली. या जहाजात 450 प्रवासी होते. पैकी 340 विद्यार्थी हे डानवान शाळेचे होते. ते ब्युंगपुंग बेटावर सुटी साजरी करण्यासाठी जात होते. संकटात सापडलेल्या मुलांनी जहाजातून पालकांना संदेश पाठवला. पैकी अनेक संदेश हृदयस्पर्शी व प्रेमळ होते, तर काही धक्कादायक.

किम वुंग की या मुलाने मोठ्या भावाला संदेश पाठवला, ‘माझी खोली 45 अंशांपर्यंत झुकली आहे. मोबाइलही बंद पडला आहे.’ भावाने संकटाची तीव्रता लक्षात घेऊन संदेश पाठवला, ‘घाबरू नको.. तुझ्यापर्यंत काही तरी मदत पोहोचेलच. सर्व काही ठीक होईल.’ किम याचे नाव बेपत्ता 287 प्रवाशांच्या यादीत समाविष्ट असून त्याचा शोध सुरू आहे. एका मुलीने वडिलांना संदेश पाठवला, ‘तुम्ही घाबरू नका. मी लाइफ जॅकेट घातले आहे. माझ्यासोबत इतरही मुली आहेत.

पालकांचा निष्काळजीपणाचा आरोप
दरम्यान, बेपत्ता शाळकरी मुलांच्या पालकांनी या दुर्घटनेवर तसेच त्यानंतर सुरू असलेल्या मदतकार्यावर नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रपती पार्क गुन हे व तपास पथकातील अधिकारी निष्काळजीपणे हे अभियान राबवत असल्याचा त्यांचा आरोप आहे. शेकडो पालक, नागरिक रुग्णालयाबाहेर, कारमध्ये व रस्त्यावर बसून मुलांना समुद्रातून काढण्याची प्रतीक्षा करत होते. एक पालक क्वांक ह्यूनओक यांनी सांगितले की, ‘मी सरकारवर नाराज आहे. त्यांनी मुलांना वाचवण्यासाठी काहीच केलेले नाही.’ एक आई म्हणाली, ‘मला पोहता आले असते तर मी समुद्रात जाऊन मुलाला वाचवले असते.’

लाटा, पावसाचा अडथळा
बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अभियानात उंच लाट, पाऊस व वार्‍याचा अडथळा येत आहे. बुडत्या जहाजात ऑक्सिजन पोहोचवण्याचाही प्रयत्न केला जात आहे. जहाज बुडलेल्या ठिकाणी 12 अंश सेल्सियस तापमान आहे. या वातावरणात 90 मिनिटे राहिले तरी हायपोथर्मिया होण्याचा धोका आहे. हा परिसर 37 मीटर खोल आहे.

20 वर्षांतील सर्वात भीषण दुर्घटना
दक्षिण कोरियातील गेल्या 20 वर्षांतील ही सर्वात भीषण सागरी दुर्घटना आहे. सरकारच्या वतीने आतापर्यंत पाच विद्यार्थी व दोन शिक्षकांसह नऊ जणांच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली आहे. जहाजावर 325 विद्यार्थ्यांसह 475 लोक होते. पैकी 179 जणांना वाचवण्यात आले असून इतरांचा शोध सुरू आहे.