आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Don\'t Disturb Boundary, China Alarming To India

सीमेवर तणाव वाढवू नका, अ‍ॅंटनींच्या दौ-यापूर्वीच भारताला चीनचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांच्या दौ-याला सुरुवात होण्याच्या काही तास अगोदर चीनने उलट्या बोंबा मारण्यास सुरुवात केली आहे. सरहद्दीवर लष्कर वाढवून तणाव निर्माण करू नका, असा इशारा चीनने भारताला दिला आहे. दरम्यान, संरक्षणमंत्री अँटनी एअर इंडियाच्या विमानाने शांघायमध्ये दाखल झाले.


चीन-भारत सरहद्दीवर तणाव आणि काही समस्या आहेत. ही गोष्ट नाकारून चालणार नाही, असे मेजर जनरल लुओ यॉन यांनी म्हटले आहे. अँटनी यांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर भारत-चीन संबंधावर पीपल्स लिबरेशन आर्मीची (पीएलए) भूमिका या प्रश्नावर बोलताना यॉन बोलत होते. भारताने सरहद्दीवरील लष्करी सैन्यात वाढ केल्याचे दिसून येत आहे, असे यॉन यांनी म्हटले आहे. ऑल चायना जर्नलिस्ट्स असोसिएशनच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना यॉन बोलत होते. देपसांग दरीतील घुसखोरीच्या प्रकरणात मात्र यॉन काहीसे बॅकफूटवर दिसून आले आहेत. हा मुद्दा प्रसारमाध्यमातून पेटवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. दोन महिन्यांपूर्वी लडाखमध्ये घुसखोरी करून चीनने भारतीय सरहद्दीत तंबू ठोकले होते. मात्र, अँटनी यांच्या दौ-याच्या निमित्ताने चीनने आधीच कांगावा करून दबाव बनवण्याचा प्रयत्न केला आहे.


म्हणे भू-प्रदेश बळकावला
सरहद्द भागातील 90 हजार चौरस किलोमीटर भू-प्रदेश भारताने बळकावला आहे. वास्तविक हा प्रदेश आमच्या मालकीचा आहे, परंतु भारताने तो ताब्यात घेतला आहे. असे चीनने म्हटले आहे. लुओ यांनी हे वक्तव्य अरुणाचल प्रदेशकडे संकेत करताना केले आहे. कारण चीन अरुणाचल प्रदेशला दक्षिण तिबेट म्हणून संबोधते. वास्तविक दोन्ही देशांतील 4 हजार किलोमीटरची रेषा हा खरा वादाचा मुद्दा आहे, परंतु हे क्षेत्र दोन हजार किलोमीटर असल्याचा दावा चीन करत आले आहे.


सात वर्षांत पहिलीच बैठक : अँटोनी यांचा चीन दौरा दोन्ही देशांसाठी महत्त्वाचा मानला जातो. कारण सात वर्षांत चीनला भेट देणारे अँटोनी हे पहिलेच भारतीय संरक्षणमंत्री आहेत. त्यांचा हा तीन दिवसांचा दौरा आहे. या भेटीत अँटोनी चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांच्याशी देखील चर्चा करण्याची शक्यता आहे.


आज चर्चा : सरहद्द मुद्द्यावर ए. के. अँटोनी व जनरल चाँग वॅनकॉन यांच्यात शुक्रवारी बैठक होणार आहे. या अगोदर सरहद्दप्रश्नी उभय देशांत 28 जून रोजी चर्चा झाली होती. बैठकीत उभय नेते दोन्ही देशांतील सौहार्दपूर्ण संबंध, सरहद्दीवरील शांतता व्यवस्थेसह इतर अनेक मुद्द्यांवर बोलणी करतील.


ब्लॉगवर नेहमीच शिमगा : चिनी जनरल लुओ यॉन आपल्या ब्लॉगमुळे नेहमीच वादात असतात. भारताच्या नावाने शिमगा करण्याची त्यांची सवय जुनीच आहे. या परंपरेनुसार त्यांनी मिळेल त्या व्यासपीठावर भारताबद्दल आगपाखड करण्याचे धोरण अवलंबल्याचे राजकीय निरीक्षकांना वाटते.