आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dozens Reportedly Killed After Massive Earthquake Hits Iran Pakistan Border

इराणमध्‍ये भूकंपात 100 बळी, भारतातही हादरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/दुबई- दिल्लीसह उत्तर भारत मंगळवारी भूकंपाने हादरला. याचे केंद्र इराण-पाकिस्तान सीमेवर होते. इराणमध्ये या नैसर्गिक आपत्तीने सर्वाधिक जीवित व वित्तहानी झाली असून 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. हजारो जखमी झाले आहेत. पाकिस्तानात 34 लोक ठार झाले आहेत. भारतात मात्र कोठेही मोठी पडझड झालेली नाही.

अमेरिकी भूगर्भशास्त्र विभागाच्या नोंदींनुसार भूकंपाची तीव्रता 7.8 रिश्टर होती. इराणमध्ये गेल्या चाळीस वर्षांत एवढ्या मोठ्या तीव्रतेचा झालेला हा पहिलाच भूकंप आहे. यात खश व सरावन या शहरांत सर्वाधिक पडझड झाली असून या देशाचे आण्विक प्रकल्प मात्र सुरक्षित आहेत. यापूर्वी 9 एप्रिल रोजी इराण भूकंपाने हादरला तेव्हा 37 लोकांचा मृत्यू तर 850 जण जखमी झाले होते.

भीतीने पळापळ
राजधानी दिल्लीसह इतर राज्यांत जाणवलेल्या भूकंपाची तीव्रता खूपच कमी होती. कोठेही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही; परंतु एकापाठोपाठ एक जाणवणारे हादरे आणि आवाजामुळे एकच धावपळ उडाली. लोक घरांतून तसेच कार्यालयांतून बाहेर पळत सुटले. हाद-यांनंतर कितीतरी तास धास्तावलेले लोक इमारतींबाहेरच थांबले होते.

सकाळी : आसाममध्ये 1 ठार
सकाळी भूकंपाचे हादरे बसले. यात एका मुलीचा मृत्यू तर 3 लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. तीव्रता 4.6 नोंदली गेली.

दुपारी : अरुणाचल हादरले
अरुणाचलमध्ये दुपारी दोनच्या सुमारास सौम्य हादरा बसला. याची तीव्रता 5 नोंदली गेली. या भूकंपाचे केंद्र भारत-चीन सीमेवर होते.

सायंकाळी : दिल्लीत चार-पाच हादरे दिल्ली परिसरात सव्वाचारच्या सुमारास एक मिनिटाच्या अंतरात चार ते पाच हादरे जाणवले. पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात आणि आसाममध्येही जमीन हादरली.

जायकवाडीत 4.9 रिश्टर नोंद
पैठण- इराण तसेच दिल्लीसह उत्तर भारत आणि पाकिस्तानमध्ये जाणवलेल्या भूकंपाची पैठणजवळ जायकवाडी भूकंपमापक केंद्रात नोंद झाली. मंगळवारी दुपारी 4.18 वाजता 4.9 रिश्टर स्केलची ही नोंद आहे. जवळपास 18 सेकंद हा भूकंप जाणवल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली.