आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Manmohan Singh Comment On Kashmir At Sanyut Rashtrasangh

दहशतवाद्यांना पाकिस्तानचे अभय, काश्मीर भारताचेच; डॉ.मनमोहनसिंग यांचे चोख प्रत्युत्तर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संयुक्त राष्ट्रसंघ- कलंकित लोकप्रतिनिधींच्या बचावाखातर यूपीए सरकारने काढलेल्या अध्यादेशावरून टीकेचे लक्ष्य झालेले पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग शनिवारी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत प्रचंड आक्रमक झाले. आपण कमकुवत नाहीत हे दाखवून देत त्यांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. दहशतवादाला पाकिस्तानचीच फूस असल्याचे सांगून पाकमधून मिळणार्‍या मदतीवरच भारतीय हद्दीत अतिरेक्यांच्या घातपाती कारवाया सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. व्याप्त काश्मीरमधूनच कारवाया चालवल्या जात असल्याचेही ते म्हणाले.

सिमला करारानुसार चर्चा
पाक पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे व्यासपीठ पुन्हा एकदा काश्मीर मुद्दा तापवण्यासाठी वापरले. यावर एका वृत्तवाहिनीशी बोलताना हा मुद्दा आपण मुद्दाम या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडल्याचेही त्यांनी सांगितले. यावर डॉ. सिंग यांनी अत्यंत आक्रमकपणे सुनावले की, फक्त सिमला करारानुसार चर्चा करण्याची भारताची कधीही तयारी आहे.

चर्चेसाठी 3 अटी
अनेक वर्षांनंतर पंतप्रधानांनी काश्मीर मुद्दय़ावर आणि पाक सीमेवरून सुरू असलेल्या घुसखोरीवर आक्रमक भाष्य केले. पाकशी चर्चेची तयारी असल्याचे नमूद करून त्यांनी तीन अटी ठेवल्या.
1. काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचे पाकिस्तानने अगोदर मान्य करावे. यानंतरच दोन्ही देशांत विविध मुद्दय़ांवर सुसंवादी चर्चा होऊ शकेल.
2. पाक सरकारने दहशतवाद्यांना आर्थिक व शस्त्रास्त्रांची मदत बंद करावी. जेणेकरून दहशतवादांचा खात्मा करता येईल.
3. आपल्या भूभागाचा वापर अतिरेक्यांना करू देता कामा नये. तरच चर्चा शक्य.

पाकिस्तानवर थेट आरोप
1. दाऊद इब्राहिमसह अनेक दहशतवादी आज पाकिस्तानात वास्तव्यास आहेत.
2. सांबा व इतर भागांतून दहशतवाद्यांना मदत दिली जात असल्याचे पुरावे.
3. व्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना खुलेआम प्रशिक्षण दिले जात आहे.
4. दहशतवाद्यांना आर्थिक मदत देऊन पाकिस्तान फूस लावत आहे.

0 सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध कलंकित खासदार-आमदारांना अभय देणारा अध्यादेश निर्थक असल्याच्या राहुल गांधी यांनी शुक्रवारी केलेल्या वक्तव्यामुळे एक प्रकारे पंतप्रधान मनमोहनसिंग यांचाच अवमान झाला.
0 देशात अवमान आणि अमेरिकेत मात्र सन्मान, असे चित्र शुक्रवारी दिसले. मनमोहनसिंग यांचा मुत्सद्दीपणा आणि मैत्रीखातर खुद्द अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवला.
0 शुक्रवारी उभय नेत्यांची बैठक संपल्यानंतर ऑफिसमधून बाहेर पडताना ओबामा स्वत: मनमोहन यांना व्हरंड्यातून दारापर्यंत सोडवण्यासाठी आले. हा दुर्मिळ क्षण पाहून प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी व नागरिकही चकित झाले.

राष्ट्रसंघावरही केली टीका
सीमापार दहशतवादाबद्दल डॉ. सिंग यांनी संयुक्त राष्ट्रसंघालाही सोडले नाही. कोणत्याही देशाने दहशतवाद्यांना अभय देऊ नये आणि शस्त्रे पुरवू नयेत, त्यांना प्रशिक्षण देऊ नये यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने कठोर भूमिका घ्यावी, असे ते म्हणाले.