मोनरोव्हिया/वॉशिंग्टन - पश्चिम आफ्रिकी देशांमध्ये जीवघेण्या इबोला विषाणूचा संसर्ग वाढतच असून गेल्या तीन दिवसांत यामुळे 45 जणांचा मृत्यू झाला आहे. कोणताही उपचार नसलेल्या या संसर्गजन्य आजारामुळे लायबेरियात आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. इबोला संसर्ग झालेल्या रुग्णांवर कोणत्याही औषधांचा प्रभाव होत नसल्यामुळे उपचारांवरच अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी गंभीर रुग्ण व त्यांच्यावर उपचार करणार्यांवर औषधांची चाचणी करण्याची परवानगी दिली आहे. सध्या उपलब्ध असलेल्या औषधांबाबत कोणतीही हमी देता येत नाही. पुढील आठवड्यात जिनेव्हा येथे जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूटीओची बैठक आहे. इबोलावर मारक ठरणार्या औषधांचा प्रयोग माणसांवर करायचा की नाही, यासंदर्भातील निर्णय या बैठकीत घेतला जाईल, तसेच इबोलाला जागतिक आपत्ती घोषित करण्याचाही निर्णय या वेळी घेतला जाईल.
गिनी, लायबेरिया, सिएरा लिओन व नायजेरियामध्ये आतापर्यंत इबोलामुळे 932 पेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. नायजेरियात एक परिचारिका, सौदी अरबमध्ये एक उद्योगपती आणि लायबेरियातील एक पादरीही इबोलाच्या विळख्यात सापडले आहेत. इबोलाच्या रुग्णांवर उपचार करणार्या 60 आरोग्य कर्मचार्यांचाही मृत्यू झाला आहे. भारत व ग्रीसने या देशांमध्ये न जाण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे. भारतातील सुमारे 45,000 नागरिक या देशांमध्ये वास्तव्य करून आहेत.
इबोला आहे काय?
आफ्रिकन देशांत पसरलेला हा रोग आहे. 1976 मध्ये सुदान आणि कांगोमध्ये या रोगाचे रुग्ण आढळले. नंतर सहारा प्रदेशांत हा रोग पसरला. 2014 मध्ये पश्चिम आफ्रिकी देशात हा रोग पसरत चालला आहे. गिनी, सिएरा लिओन, लायबेरिया आणि नायजेरिया या देशांना इबोलाने घेरले आहे.
लक्षणे काय ?
या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर दोन-तीन आठवड्यांत हा रोग शरीरात पसरतो. ताप, गळा खवखवणे, प्रचंड अंगदुखी, डोकेदुखी, उलट्या, जुलाब ही या रोगाची प्राथमिक लक्षणे आहेत. हळूहळू यामुळे यकृत आणि मूत्राशयावर परिणाम होतो. काही लोकांना शरीरातून रक्तस्रावाचा त्रास होतो.
स्पॅनिश रुग्णाला माद्रिदमध्ये आणले
माद्रिद : एका वयोवृद्ध स्पॅनिश धर्मप्रसारकाला लायबेरियातील वास्तव्यामुळे या रोगाचा बाधा झाली. गुरुवारी तो विमानाने माद्रिद विमानतळावर उतरताच त्याला त्वरित युरोपातील उपचार केंद्रात रवाना करण्यात आले. युरोपात हलवण्यात आलेला हा पहिला इबोला रुग्ण आहे. 75 वर्षीय मिगुयेल पाजारेस हे कॅथोलिक धर्मगुरू आहेत.
इबोलाग्रस्तांना रस्त्यावर टाकले
इबोलामुळे लोक इतके धास्तावले आहेत की याची लागण झालेल्यांना कुटुंबीय सरळ रस्त्यावर आणून टाकत आहेत. कुटुंबातील इतरांना लागण होऊ नये हा त्यामागचा हेतू आहे. रस्त्यावर आणून टाकत असल्याच्या प्रकाराला लायबेरियाचे प्रसारणमंत्री लेविस ब्राऊन यांनी दुजोरा दिला आहे.