आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Edwar Snoweden Escaped From Obama Administration

एडवर्ड स्नोडेनला आश्रय देणा-या देशांना अमेरिकेचा इशारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हाँगकाँग - अमेरिकेचे सायबर हल्ले आणि हेरगिरी चव्हाट्यावर आणणारा 30 वर्षीय तरुण एडवर्ड स्नोडेन ओबामा प्रशासनाच्या हातून निसटला. त्याने हाँगकाँगमधून रविवारी थेट मॉस्कोला पलायन केले आहे. तिथून तो क्युबामार्गे व्हेनेझुएलामध्ये राजाश्रय घेण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे विकिलीक्स वेबसाइटची महिला कर्मचारीही त्याच्यासोबत आहे. तर स्‍नोडेनला राजाश्रय देणा-या देशांना अमेरिकेने इशारा दिला आहे. त्‍याला आंतरराष्‍ट्रीय प्रवास करण्‍याची परवानगी देण्‍यात येऊ नये, असे अमेरिकेने म्‍हटले आहे. त्‍याच्‍याविरुद्ध गंभीर आरोप आहेत. त्‍यामुळे त्‍याला रोखण्‍यात यावे, असे अमेरिकेने स्‍पष्‍ट केले आहे.

स्नोडेनच्या प्रत्यार्पणासाठी शनिवारी व्हाइट हाऊसने हाँगकाँग सरकारशी अधिकृतपणे संपर्क साधला होता. अमेरिका व हाँगकाँग यांच्यात गुन्हेगार हस्तांतरणाचा करार आहे. स्नोडेनवर सरकारी मालमत्तेच्या चोरीचा गुन्हेगारी स्वरूपाचा आरोप अमेरिकेने ठेवल्यामुळे त्याचे हस्तांतरण रोखणे हाँगकाँगला शक्यही नव्हते, परंतु अमेरिकेने पाठवलेली कागदपत्रे हाँगकाँगच्या कायद्यानुसार परिपूर्ण नाहीत असे कारण पुढे करून स्नोडेनला पलायनाची संधी देण्यात आली. सायंकाळी तो मॉस्को येथे पोहोचला. रविवारी तेथे मुक्काम करून तो सोमवारी एसयू -150 या विमानाने व्हेनेझुएलाची राजधानी कॅराकसकडे प्रयाण करणार आहे, अशी माहिती रशियन वृत्तसंस्थेने दिली.


चीनच्या शिन्हुआ विद्यापीठावरही सायबर हल्ला
हाँगकाँग सोडण्यापूर्वी स्नोडेन याने अमेरिकेला आणखी अडचणीत आणले. हाँगकाँग येथील ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने चीनचे प्रमुख विद्यापीठ शिन्हुआ आणि आशिया प्रशांत भागातील फायबर ऑप्टिक नेटवर्क ऑपरेटर पॅकनेटच्या संगणकांवरही अमेरिकेने सायबर हल्ले केल्याचा आरोप केला. सेलफोन कंपन्यांच्या संगणकांवर हल्ले करून चिनी नागरिकांच्या एसएमएस अमेरिकेने चोरले होते, असे त्याने सांगितले. ही मुलाखत 12 जून रोजी घेण्यात आली होती.

गतवर्षी चीनमध्ये 90 हजार कोटी एसएमएसचे आदानप्रदान झाले. शिन्हुआ विद्यापीठाच्या 63 संगणक व सर्व्हर्सवर हल्ले करण्यात आले. पॅकनेट कंपनीचे 13 देशांमध्ये व 46 हजार किलोमीटरचे फायबर ऑप्टिकचे जाळे पसरलेले आहे. कंपनीचे मुख्यालय हाँगकाँग व सिंगापूर येथे आहे.


61 हजार सायबर हल्ले
अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा संस्था (एनएसए)ने जगभरात एकूण 61 हजार सायबर हल्ले केले असा दावाही स्नोडेन याने केला होता. शक्तिशाली संगणकांच्या पायाभूत नेटवर्कवरच (नेटवर्क बॅकबोन्स ) हल्ला करण्यात येत असे.त्यामुळे लाखो नागरिकांच्या संगणकांची माहिती आपोआपच हाती लागत होती. शिन्हुआ विद्यापीठात चीनचे सहा प्रमुख नेटवर्क आहेत. या ठिकाणी कोट्यवधी नागरिकांची संगणकीय माहिती गोळा केली जाते.