आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इजिप्तमध्ये पुढील वर्षी निवडणुका, मुस्लिम ब्रदरहूडचा मात्र विरोध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कैरो - इजिप्तमध्ये प्रचंड हिंसाचार आणि एकाच दिवसात 51 जणांचा मृत्यू झाल्यानंतर हंगामी राष्ट्राध्यक्ष अदली मन्सूर यांनी सत्ता हस्तांतरणाची योजना जाहीर केली आहे. त्या योजनेनुसार 2014 च्या प्रारंभी नवीन संसद अस्तित्वात आल्यानंतर राष्ट्राध्यक्षांची निवडणूक घेतली जाणार आहे. मन्सूर यांनी सोमवारी रात्री ही घोषणा केली खरी, मात्र मंगळवारी मुस्लिम ब्रदरहूडने ती फेटाळून लावत देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे.


बळजबरीने सत्ता ताब्यात घेणा-यांची कोणतीही गोष्ट आम्ही मानणार नाही, असे मुस्लिम ब्रदरहूडने म्हटले आहे. पदच्युत राष्ट्राध्यक्ष महंमद मुर्सी यांच्या फ्रीडम अँड जस्टिस पार्टीचे कायदेशीर सल्लागार अहमद अबू बराख यांनी मन्सूर यांची ही योजना अवैध आणि बेकायदा असल्याचे म्हटले आहे. तिकडे मुस्लिम ब्रदरहूडचे प्रवक्ते गहद अलहद्दाद यांनी हंगामी सरकारविरुद्धचे आंदोलन तीव्र करण्याची घोषणा केली आहे. हंगामी राष्ट्राध्यक्षांची निवड कोणीही मतदान करून केलेली नाही. राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी घेतलेली शपथ बेकायदा आहे. त्यामुळे त्यांचा निर्णय जनता मान्य करणार नाही, असे अलहद्दाद यांनी म्हटले आहे.


हंगामी राष्ट्राध्यक्षांची योजना
> राज्यघटनेच्या पुनर्विलोकनासाठी 15 दिवसांत समितीची स्थापना.
> चार महिन्यांत घटनादुरुस्तीला अंतिम स्वरूप देऊन जनमत संग्रह करणार.
> 2014 च्या प्रारंभीच संसदीय निवडणुका घेणार.
> नवीन संसद अस्तित्वात आल्यानंतर राष्ट्राध्यक्षांची निवडणूक घेणार.