आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इजिप्तचे राष्‍ट्राध्यक्ष मुर्सी यांनी लष्‍कराने दिलेला 48 तासांचा अल्टिमेटम फेटाळला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कैरो - इजिप्तमध्ये निर्माण झालेल्या आणीबाणीच्या परिस्थितीच्या संकटावर 48 तासांत तोडगा काढण्याचा लष्कराने दिलेला अल्टिमेट राष्ट्रपती महंमद मुर्सी यांनी मंगळवारी धुडकावून लावला. ‘राष्ट्रीय दिलजमाई’साठी आपण आपल्याच योजनेनुसार पुढील पावले टाकणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.


इजिप्तच्या लष्कराने देशातील विद्यमान संकटावर समाधानकारक तोडगा काढण्यासाठी राजकीय नेतृत्वाला सोमवारी 48 तासांची मुदत दिली होती. दरम्यान, परराष्‍ट्रमंत्री महंमद कामेल अमर यांनीही मंगळवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देणारे कामेल हे मुर्सी कॅबिनेटमधील 5 वे मंत्री असून त्यांच्या राजीनाम्यामुळे मुर्सी यांच्यावर दबाव वाढला आहे. राजकीय तोडगा काढण्यासाठी मुर्सी यांनी मंगळवारी पंतप्रधान हिशम कांदील आणि संरक्षण मंत्री जनरल अब्देल फताह अल- सीसी यांच्याशी चर्चा केली. मुर्सी सरकार व लष्कराशी चर्चा करण्यासाठी विरोधकांनी बंडखोर नेते महंमद एलर्बदेई यांची निवड केली आहे.


सरकारी वकिलाची फेरनियुक्ती : देशाचे सरकारी वकील अब्देल मेग्युद महमूद यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यात मुर्सी यांनी उचलबांगडी केली होती. त्यानंतर इजिप्तच्या ‘कोर्ट ऑफ अपिल्स’ने हा निकाल दिला. महमूद यांची फेरनियुक्ती आणि पाच मंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे मुर्सी यांची पुरती कोंडी झाली आहे.


एकही पाऊल मागे हटणार नाही : मुर्सी
नागरी लोकशाही असलेल्या 25 जानेवारी रोजी घडवून आणलेली क्रांती अत्यंत महत्त्वपूर्ण यश आहे. आता कोणत्याही परिस्थिती इजिप्त एकही पाऊल मागे टाकणार नाही, असे राष्ट्रपती भवनातून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. लोकशाहीवाद्यांच्या तीव्र आंदोलनाच्या रेट्यापुढे 2011 मध्ये हुकूमशहा होस्नी मुबारक याला पदच्युत व्हावे लागले होते. त्याचा संदर्भ या निवेदनात देण्यात आला आहे.


लष्करावर टिकेची झोड
मुर्सींना अल्टिमेट दिल्यामुळे सत्ताधारी सलाफी नूर पार्टीने लष्करावर तोफ डागली आहे. लष्कर देशातील जनतेच्या कोणत्या मागण्या पूर्ण करणार आहे? तहरीर चौकातील की राबेआ अल अदावेया चौकातील?, असा सवाल पक्षाचे सरचिटणीस शाबन अब्देल अलीम यांनी केला आहे. तहरीर चौकात मुर्सींचे विरोधक, तर राबेआमध्ये समर्थक ठाण मांडून आहेत. इराणनेही इजिप्तच्या लष्कराने जनमताचा आदर करावा, असे म्हटले आहे. तर बंड हाणून पाडण्यासाठी, प्रसंगी शहीद होण्यासाठी तयार राहा, असे आवाहन मुस्लिम ब्रदरहूडने जनतेला केले आहे.


सत्ता उलथवून टाकण्याचा विचार नाही : लष्कर
48 तासांची मुदत देण्यामागे देशातील संकटावर राजकीय नेतृत्वाने तातडीने तोडगा काढावा, असा आमचा हेतू होता. बंड करून सत्ता उलथून टाकणे आमच्या रक्तात नाही, असे इजिप्तच्या लष्कराने मंगळवारी फेसबुक पेजवर स्पष्ट केले आहे.


लोकांचे म्हणणे ऐकून घ्या
इजिप्तमधील राजकीय संकट चिघळत असून इजिप्तच्या सर्व नागरिकांचा आवाज ऐकून घेतलाच पाहिजे, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी महंमद मुर्सी यांना दूरध्वनीवरून दिल्याचे व्हाइट हाऊसने म्हटले आहे.