आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Egypt Under Controlled Army; 23 Claimed In Cairo University, 200 Injured

इजिप्त लष्कराच्या ताब्यात; कैरो विद्यापीठात रक्तरंजित संघर्षात 23 ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कैरो - लोकक्षोभामुळे निर्माण झालेले संकट क्षणाक्षणाला गंभीर वळणावर येऊन ठेपत असताना इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष महम्मद मुर्सी यांनी सत्ता सोडण्याची मागणी बुधवारी पुन्हा धुडकावून लावली. इजिप्तच्या सामर्थशाली लष्कराचे प्रमुख आणि राष्ट्राध्यक्ष या दोघांनीही देशाच्या रक्षणासाठी स्वत:चे बलिदान देण्याची तयारी दाखवल्यामुळे उभयतांमध्ये तडजोड होण्याची शक्यताही धुसर दिसू लागली आहे. परिणामी इजिप्त पुन्हा यादवीच्या मार्गावर जाण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे.


अल्टिमेटमची मुदत संपत येत असतानाच लष्कराने कैरोतील सर्व दूरचित्रवाणी वाहिन्यांचे स्टुडिओ ताब्यात घेतले आहेत. अनेक ठिकाणी रणगाडेही तैनात केले आहेत. देशातील सर्व बँका बंद ठेवण्याचे आदेशही लष्कराने दिले आहेत. तहरीर चौकात जमलेल्या उदारमतवादी आंदोलकांच्या मागण्या मान्य करून देशात निर्माण झालेल्या अभूतपूर्व राजकीय संकटावर तोडगा काढण्यासाठी लष्कराने मुर्सी यांना 48 तासांचा अल्टिमेटम दिला होता. तो संपल्यानंतर लष्कराने घातलेली प्रवासाची बंदी मुर्सी यांनी फेटाळली आहे. इजिप्त पुन्हा लष्करी राजवटीच्या अधिपत्याखाली जाण्याच्या समीप येऊन ठेपला आहे. मुर्सीं सत्ता सोडायला तयार नसल्यामुळे कैरो विद्यापीठात उफाळून आलेल्या रक्तरंजित संघर्षात 23 जण ठार तर 200 जण जखमी झाले आहेत.


हौतात्म्य पत्करेन पण राजीनामा देणार नाही - मुर्सी
61 वर्षीय मुर्सी यांनी बुधवारी 46 मिनिटे राष्ट्राला उद्देशून अंत्यत भावनिक भाषण केले. इजिप्तमधील दूरचित्रवाणीवर त्याचे थेट प्रसारण करण्यात आले. राष्ट्राध्यक्षांच्या घटनात्मक वैधतेचा आदर राखणे हाच रस्त्यावर होणारा भविष्यातील रक्तपात टाळण्याचा एकमेव पर्याय आहे. देशासाठी बलिदान देण्याची माझी तयारी आहे. हिंसाचार आणि हुल्लडबाजीच्या राजकारणाला मी कदापि बळी पडणार नाही, असे त्यांनी आंदोलकांना ठणकावून सांगितले. खुल्या आणि भयमूक्त वातावरणात झालेल्या मतदानाद्वारे देशाचे नेतृत्व करण्यासाठी आपण निवडून आलो आहोत. आपण इजिप्तचे एकमेव लोकनियुक्त नेते असल्याने माझ्या कर्तव्यापासून मी तसूभरही ढळणार नाही, असे मुर्सी यांनी म्हटले आहे.


सहमतीच्या सरकारचा प्रस्ताव
अल्टिमेटमची मुदत संपल्यानंतर लष्कराशी संघर्ष टाळण्यासाठी राष्ट्राध्यक्ष महंमद मुर्सी यांनी सर्वसहमतीचे सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. आगामी संसदीय निवडणुकीपर्यंत देशात हे सरकार कार्यरत राहील, असे राष्ट्राध्यक्ष निवासातून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. मुर्सी यांनी घटनादुरुस्ती करून कट्टर मूलतत्त्ववाद वगळण्याची तयारीही दर्शवली आहे, परंतु राष्ट्राध्यक्षपद आपल्याकडेच ठेवण्याचा त्यांचा इरादा या निवेदनात स्पष्ट करण्यात आला आहे.


संरक्षण मंत्रालयाने पिळले लष्कराचे कान
लष्कराने कोणत्याही राजकीय आंदोलनाची पाठराखण करू नये, असे आदेश इजिप्तच्या संरक्षण मंत्रालयाने जारी केले आहेत. पोलिस हे ‘लोकांसाठी’ आहेत. नागरिक आणि महत्त्वाच्या संस्थांचे रक्षण करणे हे त्यांचे कर्तव्य आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे.


रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत रक्षण : लष्करप्रमुख
मुर्सी यांना अल्टिमेट धुडकावल्यानंतर बुधवारी लष्कराने नवे निवेदन जारी केले. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत कोणत्याही दहशतवादी, मूलतत्त्ववादी किंवा ठकबाजीपासून देशाचे रक्षण करण्यास लष्कर बांधील असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. लोक दहशतीखाली आणले जात असतील आणि त्यांना धमकावले जात असेल तर त्यांच्यासाठी मरणे हा आमचा सन्मान समजतो, असे लष्कर प्रमुख महम्मद अल- बेल्तगुई यांनी या निवेदनात म्हटले आहे.


लष्कराशी संघर्षाची मुर्सी यांची तयारी
मुर्सी यांनी दूरचित्रवाणीवरून दिलेल्या भाषणातून त्यांनी आणि त्यांच्या मुस्लिम ब्रदरहूड पक्षाने सामर्थ्यशाली लष्कराचे आव्हान स्वीकारण्याची जोखीम पत्करण्याचे मनोमन ठरवल्याचे ध्वनित होते, असे राजकीय विश्लेषकांना वाटते.