आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Egyptian Court Sentences 529 People To Death News In Marathi

मुर्सींच्या 529 सर्मथकांना ठोठावली मृत्युदंडाची शिक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कैरो - माजी राष्ट्राध्यक्ष मोहंमद मुर्सी यांच्या 500 हून अधिक सर्मथकांना सोमवारी एका सामुदायिक खटल्यात इजिप्तच्या न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आहे. जगाच्या आधुनिक इतिहासातील ही सर्वात मोठी शिक्षा मानली जाते. र्जमनीच्या हिटलरनंतर एवढय़ा मोठय़ा प्रमाणात मृत्युदंड ठोठावण्याची नजीकच्या दशकातील ही पहिलीच घटना आहे.

पोलिसाची हत्या आणि हिंसाचाराच्या इतर कृत्यांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपात मुर्सींचे 529 सर्मथक दोषी आढळून आले आहेत. मिन्या न्यायालयाने अन्य 16 जणांना निर्देष मुक्त केले. पोलिस अधिकार्‍याच्या हत्येमध्ये सहभाग असल्याचा ठपका त्यांच्यावर होता. परंतु कोर्टाने 16 जणांची सुटका केली. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये इजिप्तच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या पोलिस ठाण्यावर मुस्लिम ब्रदरहुडच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. मुर्सी यांच्या सुटकेची मागणी करत कार्यकर्त्यांनी पोलिसांवर हल्ला केला होता. त्या वेळी रस्त्यावर 1200 मुर्सी सर्मथक उतरले होते. त्यापैकी काही जणांवर सुनावणी घेण्यात आली. मंगळवारी आणखी 700 जणांवर खटल्याची सुनावणी घेतली जाणार आहे. दरम्यान, जुलै महिन्यात लष्कराने मुर्सी यांची सत्तेवरून हकालपट्टी केली होती. तेव्हापासून हजारो मुर्सी सर्मथकांवर अटकेची कारवाई करण्यात येत आहे.

प्रचंड दडपशाही
मुर्सी सर्मथकांनी ऑगस्टमध्ये रस्त्यावर उतरून जोरदार हिंसाचार केला होता. त्यानंतर कट्टरवादी सर्मथकांवर सत्ताधारी पक्षाकडून कडक कारवाई करण्यात आली. ठिकठिकाणी धरपकड, मारहाण झाली. त्यामुळे दडपशाहीचा मुस्लिम ब्रदरहुडच्या कार्यकर्त्यांत सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

ब्रदरहुडच्या नाड्या आवळल्या : जुलै महिन्यात सत्तेवर आलेल्या लष्करी सरकारने मुस्लिम ब्रदरहुड संघटनेच्या नाड्या आवळल्या आहेत. त्यासाठी या कट्टरवादी संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्याचबरोबर या संघटनेला सर्मथन देणार्‍या कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेवर कडक कारवाई करण्यात येईल, असे सरकारने अगोदरच स्पष्ट केले आहे. त्या पार्श्वभूमीवर देशात सर्मथकांनी जोरदार आंदोलन छेडले होते. ते मोडून काढताना हिंसाचारास कारणीभूत ठरलेल्यांना झटपट मृत्युदंड ठोठावून लष्करी सरकार मुर्सी सर्मथकांवर जरब निर्माण करत आहे.

शेकडोंचा मृत्यू
सत्ताधारी सरकारने कैरोमध्ये ऑगस्टपासून केलेल्या कारवाईत शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला. हजारो नागरिकांना अटक झाली. यातील 150 अधिक नागरिक संशयित असून त्यांच्यावर खटला सुरू करण्यात आला आहे. 2011 मध्ये हुकूमशहा होस्नी मुबारक यांना क्रांतीनंतर सत्ता सोडावी लागली होती. त्यानंतर मुर्सी लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेले पहिलेच राष्ट्राध्यक्ष ठरले होते. परंतु नंतर लष्कराने सत्ता काबीज केल्यानंतर देशात पुन्हा राजकीय अनागोंदी निर्माण झाली आहे.

बचाव पक्षाची तक्रार काय ?
इजिप्तमधील खटल्याच्या निकालानंतर बचाव पक्षाचे वकील मोहंमद शुबीब यांनी पुढच्या न्यायालयात अपील करण्याचा निर्णय घेतला आहे. आपला खटला मांडण्याची संधीच देण्यात आली नाही, अशी तक्रार शुबीब यांनी केली आहे. हा खटला केवळ दोन सुनावणीमध्ये पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही शुबीब यांनी केला.