कैरो - इजिप्तमधील मुस्लिम ब्रदरहूड नेता मोहंमद बदी याच्यासह 36 समर्थकांना शनिवारी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. मोहंमद मुर्सी यांना पदावरून हटवल्यानंतर उसळलेल्या हिंसाचाराला जबाबदार असल्याचा ठपका त्यांच्यावर आहे.
देशात करण्यात आलेल्या हिंसक आंदोलनामागे बदी याचा हात असल्याचे सिद्ध झाल्यामुळे कोर्टाने त्याला दोषी ठरवले. बदीला इतर दोन प्रकरणांत अगोदरच मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हिंसाचाराच्या खटल्यातील 48 आरोपींमध्ये बदी याचा समावेश आहे. यातील 37 जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. उर्वरित 10 जणांना मृत्युदंडाची शिक्षा फर्मावण्यात आली आहे. ब्रदरहूडचा दुसर्या फळीतील म्होरक्या मोहंमद अल-बाल्तजी, ओसामा यासिन यांनाही जन्मठेप सुनावण्यात आली आहे. वाहतूक रोखणे, जनतेला वेठीस धरणे अशी कृत्ये केल्यामुळे सर्व आरोपी हे दहशतवादी कृत्यात सहभागी असल्याचा ठपका सरकारी वकिलांकडून करण्यात आला होता. तो न्यायालयाने ग्राह्य धरला.
(फोटो - ब्रदरहूड नेता मोहंमद बदी)