कैरो - मोहंमद मुर्सी यांना हटवणारे माजी लष्करप्रमुख अब्देल फताह अल-सिसी यांची इजिप्तचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. सिसी यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकूण मतदानापैकी 96.2 टक्के मतांचा कौल मिळाला आहे.
59 वर्षीय माजी लष्करप्रमुखांना जनतेने भरघोस मतांनी निवडून आणले आहे. देशातील 2 कोटी 10 लाख नागरिकांनी त्यांना कौल दिला आहे. सायंकाळपर्यंत 352 पैकी 312 मतदान केंद्रांवरील मतमोजणी पूर्ण झाली होती.
त्याचा कौल सिसी यांच्या बाजूने दिसून आल्याचा दावा टीव्ही वृत्तातून करण्यात आला आहे. निवडणुकीत एकमेव प्रतिस्पर्धी असलेले डाव्या पक्षाचे हमदीन साबाही यांना केवळ 3.8 टक्के मते मिळाल्याचे सांगण्यात आले. यंदाच्या निवडणुकीत 44.4 एवढाच मतदानाचा टक्का पाहायला मिळाला. मतदानाची प्रक्रिया तीन दिवस वाढवण्यात आल्यानंतरही टक्केवारी कमी असल्याचे पाहायला मिळाले.
तीन वर्षांपासून अस्थिर
इजिप्तमध्ये गेल्या तीन वर्षांपासून राजकीय अस्थिरता पाहायला मिळते. राजकीय अस्थिरतेमधूनच आतापर्यंत देशाने दोन राष्ट्राध्यक्ष सत्तेवरून खाली आल्याचे पाहिले आहे.
जुलैमध्ये काय घडले ?
गेल्या वर्षी जुलैमध्ये नागरिकांनी जोरदार बंड केल्याचे पाहायला मिळाले होते. संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे सिसी यांनी लोकनियुक्त मुर्सी यांना पदावरून हटवले होते. मुर्सी यांना हटवल्यापासून 1 हजार 400 हून अधिक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते.