आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eigth Years Child Save Six Members Of His Family

अमेरिकेतील आठ वर्षीय चिमुकल्याने आपल्या कुटूंबातील सहा जणांना वाचवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - घराला आग लागली असताना एका आठ वर्षीय चिमुकल्याने आपल्या कुटुंबातील सहा जणांना वाचवल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. अमेरिकेतील पेनफिल्डजवळच्या गावातील एका घरात सोमवारी पहाटे 4.45 वाजता अचानक आग लागली. या भल्यामोठ्या घराला आगीने चहूबाजूंनी वेढले होते. घरातील माणसे जिवाच्या आकांताने ओरडत होती. घरात त्यावेळी आठ वर्षांच्या टेलर डुहान याच्यासह एकूण 9 माणसे होती. या आगीच्या लोळांचा सामना करीत डुहान याने तितक्याच संयमाने आणि धाडसाने एका - एका माणसाला बाहेर काढले. नऊ जणांच्या या घरातून त्याने आजी, काकू आणि दोन चुलत भावंडांना बाहेर काढले. यात एक चार आणि सहा वर्षांचा भाऊ होता.
त्यांना वाचवल्यानंतर तो घराच्या मागील बाजूकडील बेडरूमकडे धावला. तिथे त्याचे अपंग काका आणि आजोबा होते. आजोबांना जागेवरून हलताही येत नव्हते. त्यांना उचलून घेण्यासाठी तो घराच्या मागच्या बाजूला गेला.पण तोपर्यंत आगीने घरालो वेढले होते.अखेर आग आणि धुराच्या लोळांनी हा धाडसी मुलगा, काका व आजोबांनाही कवेत घेतले.
टेलर डुहानचे शौर्य पाहून अमेरिकाही थक्क झाली. देशभरात त्याच्या धाडसाचे कौतुक होत असून डूहानचा शाही इतमामात दफनविधी करण्यात येणार आहे.
कुटुंबीयांसाठी प्राण गमावले
आठ वर्षांचा हा डुहान पेनफिल्डमधील आपल्या आजोबांच्या घरी राहायला आला होता. हे घर म्हणजे मोठ्या मालमोटारीत असलेले मोबाइल घर होते. या घरात त्याचे आजोबा, काका व इतर नातेवाईक राहत होते. डुहानच्या दफनविधीसाठी त्याचे स्नेही आणि नागरिकांनी 50 हजार डॉलर्सचा निधी जमा केला आहे.
मुलाचा अभिमान वाटतोय..
डुहानची शौर्यकथा ऐकल्यानंतर आई क्रिस्टल रुमन यांनी दुहेरी भावना व्यक्त केल्या. ‘डुहानच्या या धाडसाबद्दल त्याचा अभिमान वाटतोय; पण मला माझा मुलगा परत हवा आहे’, अशा शब्दांत त्यांनी व्याकुळता व्यक्त केली. डुहानच्या धाडसाबद्दल शाळेकडूनही सन्मानपत्र देण्यात आले.
तांडवानंतरचे दृश्य
पाच-सहा तास चाललेल्या या आगीच्या तांडवात डूहान आणि त्याचे आजोबा मृत्युमुखी पडले. आगीत भस्मसात झालेल्या काळ्याकुट्ट घरातील बिछान्यावर डूहान व आजोबांचा मृतदेह होता.तो आजोबांना उचलून बाहेर पडतानाच आगीने वेढल्याने त्यांचे मृतदेह तशाच अवस्थेत होते. बाजूच्याच एका खोलीत आणखी एका नातेवाइकाचा मृतदेह आढळला. तसेच अनेक पाळीव कुत्री, मांजरे, ससेही मृत्युमुखी पडले.