आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कब कौन कैसे ‘उठेगा’... सांगेल आता अ‍ॅप !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - ज़िंदगी और मौत ऊपर वाले के हाथ हैं जहांपनाह, उसे ना आप बदल सकते हैं और ना मैं... कब कौन कैसे उठेगा...कोई नहीं बता सकता...! "आनंद' चित्रपटातील या डायलॉगवर आक्षेप घेणारा आतापर्यंत कुणीही नसावा. मात्र मानवी आयुष्यात पदोपदी साथ देणारे नवनवीन अ‍ॅपयुक्त तंत्रज्ञान आता हे त्रिकालाबाधित सत्यच धूसर करू पाहत आहे.
शास्त्रज्ञांनी विकसित केलेले नवे अ‍ॅप आपली जीवनशैली, उंची, रक्तदाब, झोप आणि शारीरिक हालचालींवरून आपले आयुष्य किती शिल्लक आहे, याचा अंदाज लावू शकणार आहे.
‘डेडलाइन’ म्हणजे मृत्युघंटा तर नव्हे? : अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या या अ‍ॅपला डेडलाइन असे नाव देण्यात आले आहे. आयफोनमधील हेल्थकिटद्वारे हे अ‍ॅप्लिकेशन एखाद्या उत्पादनाची एक्स्पायरी डेट सांगतो त्याप्रमाणे आपल्या देहाची कालबाह्यता झटक्यात सांगू शकणार आहे. त्यामुळे डेडलाइनने दिलेला इशारा ही मृत्युघंटा समजण्यास काहीच हरकत नाही.

काउंटडाऊन : स्मार्टफोनमधील हेल्थकिटमधील नोंदींच्या आधारे हे अ‍ॅप्लिकेशन आपल्या आयुष्याचे गणित लावेल. हेल्थकिटद्वारे युजरची उंची, रक्तदाब नोंदवला जातो. तसेच त्याची झोप आणि दैनंदिन हालचालींचीही नोंद ठेवली जाते. ही माहिती आणि जीवनशैलीविषयक आणखी काही प्रश्नांची उत्तरे वापरकर्त्याकडून मिळवून हे अ‍ॅप्लिकेशन आपण जास्तीत जास्त किती काळ जगणार याचा अंदाज बांधते आणि नंतर सुरू होतो काउंटडाऊन...

आरोग्याविषयी जागृत राहण्यासाठी निर्मिती
आपल्या मृत्यूचा अंदाज बांधणारे अ‍ॅप्लिकेशन विकसित केलेले शास्त्रज्ञ मात्र हा अंदाज शंभर टक्के बरोबर असेल, असा दावा करत नाहीत. या अ‍ॅप्लिकेशनचा सकारात्मकतेने वापर करत आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला आहे. या संकेतानंतर आपण जीवनशैलीत वेळीच बदल घडवून आणू शकतो, तसेच डॉक्टरांचा सल्लाही घेऊ शकतो. म्हणजेच सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास अ‍ॅपच्या मदतीने आपण आपला मृत्यू आणखी काही काळ दूर ठेवू शकतो, असे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.