आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ex Pakistan President Pervez Musharraf Speeds Away From Court

पोलिसांना हुसकावून मुशर्रफ न्यायालयातून पळाले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- इस्लामाबाद उच्च न्यायालयाने गुरुवारी तत्काळ अटकेचे आदेश देताच पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी भर न्यायालयातून पळ काढला. पोलिस, कमांडोंच्या गराड्यातून वाट काढीत मुशर्रफ थेट आपल्या फार्महाऊसवर पळून गेले. सन 2007 मधील आणीबाणीप्रसंगी 60 न्यायाधीशांची बडतर्फी केल्याबद्दल न्यायालयाने हे आदेश बजावले होते. दरम्यान,उच्च न्यायालयाच्या निर्णयाला ते सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी त्यांचे वकील गेले मात्र औपचारिकता पूर्ण करण्यातच कामकाजाची वेळ संपल्याने याचिका दाखल करण्यास अपयश आहे.

सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून पाकिस्तानी राजकारणात परत येण्याचे मनसुबे असलेल्या मुशर्रफ यांना एकापाठोपाठ एक धक्के बसले आहेत. सन 2007 मधील आणीबाणीप्रकरणी त्यांनी अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता. याचिकेच्या सुनावणीसाठी सकाळी ते आपले समर्थक आणि सुरक्षा रक्षकांसह न्यायालयात दाखल झाले. जामिनाला मुदतवाढ देण्याची याचिका न्यायमूर्ती शौकत अझीझ सिद्दिकी यांनी फेटाळून तत्काळ अटक करण्याचे फर्मान सोडले.न्यायमूर्तींनी आदेश सुनावताच मुशर्रफांच्या लष्करी कमांडोंनी त्यांच्याभोवती कडे करून त्यांना न्यायालयाबाहेर आणले. पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वीच मुशर्रफ काळ्या रंगाच्या एसयूव्हीत बसून न्यायालय परिसरातून पसार झाले. त्यांनी पलायन केल्याचे समजताच परिसरात एकच गोंधळ उडाला. बाहेर त्यांचे समर्थक जोरजोरात घोषणा देत होते.

काय आहे प्रकरण ?
सन 2007 मध्ये आणीबाणी लागू करून मुशर्रफांनी तत्कालीन सरन्यायाधीश इफ्तिखार चौधरींसह 60 न्यायाधीशांना जेरबंद केले होते. सन 2008 मध्ये लष्करशहापदावरून पायउतार झाल्यानंतर ते चार वर्षे विजनवासात गेले. या गुन्ह्याबद्दल ऑगस्ट 2009 मध्ये चौधरी मोहंमद अस्लम घुम्मान या वकिलाने याचिका दाखल केली. न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले होते. गेल्या आठवड्यात इस्लामाबाद न्यायालयाने त्यांना सहा आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता.