आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परवेझ मुशर्रफांच्या घराजवळ सापडली स्फोटके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्या घराजवळ स्फोटकांची पाच पॅकेट्स आढळून आली आहेत. मुर्शरफ यांना 24 डिसेंबर रोजी ज्या मार्गावरून न्यायालयात नेण्यात येणार होते, तिथे ही स्फोटके सापडली. सुरक्षेच्या कारणावरून मुशर्रफ यांना या दिवशी न्यायालयात हजर करण्यात आले नव्हते. चाक शाहजाद फार्महाऊसजवळ पार्क रोडवर स्फोटके सापडल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
प्रत्येक पॅकेटमध्ये साधारण 400-500 ग्रॅम स्फोटके होती. 24 डिसेंबर रोजी ही स्फोटके हस्तगत करण्यात आली. मुशर्रफ यांना या दिवशी राष्‍ट्रद्रोह, न्यायाधीशांना ताब्यात घेणे आणि 2007 मध्ये आणीबाणी लादल्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार होते. मुशर्रफ यांना सुरक्षा कारणावरून हजर करता येत नसल्याचे त्यांच्या वकिलांनी तेव्हा स्पष्ट केले होते. मुशर्रफ यांच्या निवासस्थानाजवळ दोन पिस्तूल, पाच मीटर डिटोनेटर वायर तसेच 16 गोळ्या आढळून आल्या. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने ब्रिफकेसमध्ये सापडलेला बॉम्ब नष्ट केला. मुशर्रफ यांना 1 जानेवारी रोजी हजर करण्यात येणार आहे.
कियानी यांनी मदत न केल्याबद्दल खेद
पाकिस्तानी लष्कराच्या प्रमुखपदावरून नुकतेच निवृत्त झालेले अशफाक कियानी यांनी राष्‍ट्रद्रोहाच्या खटल्यात मदत न केल्याबद्दल मुशर्रफ यांनी खेद व्यक्त केला आहे. मुशर्रफ यांनीच कियानी यांची लष्करप्रमुखपदी नियुक्ती केली होती. कियानी सात वर्षे लष्करप्रमुख होते. पाकिस्तानमध्ये माजी लष्करशहावर पहिल्यांदाच राष्‍ट्रद्रोहाचा खटला सुरू आहे. विशेष न्यायालयाने शिक्षा दिली तरी आपण माफीसाठी भीक मागणार नसल्याचे मुशर्रफ यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.
मुशर्रफ म्हणाले, दोषी ठरवल्यास मी माफीसाठी विनंती करणार नाही. तसेच अन्य पर्यायही मान्य करणार नाही. तसा मार्ग पत्करल्यास भीतीमुळे हा निर्णय घेतल्याचे लोकांना वाटेल. मला त्याचे वाईट वाटत नाही. आरोप अंगावर घेण्यासाठी पाकिस्तानमध्ये परतलो आहे. आपल्यावर राष्‍ट्रद्रोहाचा खटला चालू शकतो, अशी मला आशा होती.
शरीफ यांनी का रस दाखवला नाही?
मुशर्रफ म्हणाले, पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी माझ्याविरुद्ध राष्‍ट्रद्रोहाचा खटला चालवण्यात रस दाखवला नाही याचे आश्चर्य वाटते. याचा सर्वाधिक फटका तर त्यांनाच बसला आहे. 1999 मध्ये त्यांना हटवून मी सत्तेत आलो होतो.