आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकमध्ये फॅमिली ड्रामा: भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे सरन्यायाधीशांची मुलाविरुद्ध कारवाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- एखाद्या हिंदी चित्रपटाला शोभेल अशी नाट्यमय,भावनिक गुंतागुंतीची घटना पाकिस्तानात घडली आहे. सरन्यायाधीश इफ्तिखार चौधरी यांनी आपल्या मुलाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेत (स्यू मोटो) आपल्याच खंडपीठासमोर खटल्याची कारवाई सुरू केली आहे. कोर्ट रूममध्ये आता न्यायप्रिय,निर्भीड न्यायमूर्ती पिता आणि भ्रष्टाचारी पुत्र समोरासमोर उभे राहणार आहेत.
पाकिस्तानातील एक धनाढ्य उद्योगपती मलिक रियाझ हुसेन आणि इफ्तिखार चौधरी यांचा थोरला मुलगा अर्सलान इफ्तिखार यांच्यात कोट्यवधी रुपयांचा सौदा झाल्याचे वृत्त मीडियात आल्यानंतर चौधरी यांनी स्यू मोटो कारवाई करीत आपल्या मुलाविरुद्ध खटला दाखल केला आहे.सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय पूर्णपीठाने आज सकाळीच कारवाईस सुरुवात केली. मात्र कारवाई सुरू होताच अ‍ॅटर्नी जनरल इरफान कादीर यांनी कामकाजाबाबत आक्षेप घेतला. मुख्य न्यायमूर्तींचा पूर्णपीठावर समावेश असल्यामुळे न्यायदान प्रक्रियेवर विपरीत परिणाम होऊ शकतो अशी शंका कादीर यांनी व्यक्त केली. या वेळी सरन्यायाधीश चौधरी यांनी कादीर यांच्या आक्षेपाची दखल घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिष्ठेला बाधा पोचणारा कुणीही असो अगदी माझा मुलगा असला तरीही त्याची गय केली जाणार नाही अशा शब्दात चौधरी यांनी शपथेवर निवेदन केले.मुलाविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यास त्याला कायद्याप्रमाणे कठोरात कठोर शिक्षा फर्मावली जाईल असेही त्यांनी ठामपणे सांगितले. त्याचप्रमाणे प्रतिवादींना उद्या गुरुवारी पुरावे सादर करण्याचे आदेशही चौधरी यांनी दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचे निवेदन
हुसेन विरोधात सर्वोच्च न्यायालयात विविध खटले सुरू आहेत. या खटल्यामध्ये सरन्यायाधीशांनी हुसेन यांना अनुकूल असे निर्णय घेण्यासाठी सरन्यायाधीशांचा मुलगा अर्सलान याला 30 ते 40 कोटी रुपयांची लाच देण्यात आली.तसेच त्याच्या परदेशवारीचा खर्चही हुसेन यांनी उचलला असे आरोप विविध वाहिन्यांवर होत आहेत. न्यायप्रक्रि येवर प्रभाव पाडण्यासाठी हे उपद्व्याप करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला असून त्याची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय स्वत:हून कारवाई करीत आहे असे निवेदन सायंकाळी सर्वोच्च न्यायालयाने जारी केले. दरम्यान, हुसेन वैद्यकीय उपचारासाठी ब्रिटनला गेला असल्याचे त्याच्या सहकाºयाने सांगितले.
खटल्यामागचे राजकारण
चौधरी पुत्राविरोधातील आरोपाच्या टायमिंगबद्दल पाकिस्तानी मीडियात तर्कवितर्क लढवले जात आहेत. उद्योगपती हुसेन हा सत्ताधारी पाकिस्तानी पीपल्स पार्टीचा समर्थक आहे. गेल्या काही आठवड्यांपासून सर्वोच्च न्यायालयाने सरकारविरोधात धडाधड निर्णय दिले आहेत. खासकरून राष्ट्राध्यक्ष झरदारी विरोधातील भ्रष्टाचाराचे खटले पुन्हा सुरू करण्याचे आदेश. हे आदेश धुडकावल्याबद्दल पंतप्रधान गिलानी यांना अवमान नोटीस व प्रातिनिधिक शिक्षा न्यायालयाने सुनावली होती. याशिवाय न्यायालयाने नुकतेच झरदारींचे निकटवर्तीय गृहमंत्री रेहमान मलिक आणि खासदार फरहान्झ इस्पाहानी यांना दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्यावरून संसदेतून निलंबित केले आहे. मलिक यांचा आता पंतप्रधानांच्या सल्लागार म्हणून समावेश करण्यात आला असून या पदाआडून ते गृहमंत्रिपदाचा कारभार करणार आहेत.

कर्तव्यकठोर पित्याचे दिवटे चिरंजीव
डॉ.अर्सलान इफ्तिखार चौधरी हे सरन्यायाधीश इफ्तिखार चौधरींचे ज्येष्ठ पुत्र आहेत. ते सरकारी नोकरीत होते.सन 2009 मध्ये चौधरी सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्यानंतर अर्सलान यांनी नोकरीचा राजीनामा दिला. उद्योगपती हुसेन व त्याचे घनिष्ठ संबंध असल्याचे सांगितले जाते. सरन्यायाधीश चौधरी हे पाकिस्तानातील कर्तव्यकठोर न्यायाधीश समजले जातात. माजी लष्करशहा जनरल मुशर्रफ यांनी त्यांना बडतर्फ केल्यानंतर जनतेनेच सरकारविरोधात निदर्शने केली होती.

कोण आहे हा हुसेन
रियाझ हुसेन हे पाकिस्तानच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील बडं प्रस्थ आहे.जमिनींवर बेकायदा कब्जा करणे,बळजबरीने ताबा मिळवणे असे अनेक आरोप हुसेन यांच्याविरोधात आहेत. इस्लामाबाद शहराबाहेर हुसेन याने बहारिया टाऊन नामक आलिशान वसाहत उभारली आहे. या वसाहतीसाठी त्याने अनेकांच्या जमिनी लाटल्याचा आरोप असून अनेक लोकांनी त्याच्या विरोधात खटले गुदरले आहेत.