आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : मत्स्योद्योगात खंगतायत जगभरातील लाखो मुलं

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोम - मत्स्योत्पादन आणि संबंधित उद्योगांत जगभर वाढत असलेल्या बाल मजुरांच्या संख्येवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या अखत्यारितील अन्न आणि कृषी संघटना (एफएओ) आणि आंतरराष्ट्रीय मजुर संघटनेने (आयएलओ) गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या संघटनांनी जगभरातील देशांना यासंदर्भात विचारणा केली असून बालमजुरांवर होणा-या गंभीर परिणामांची जाणीव करून दिली आहे. या संघटनांनी मार्गदर्शक तत्त्वे देशांना पाठविली आहेत.

निर्धारित केलेल्या तत्त्वांना जवळपास सर्व देशांनी मान्यता दिली आहे. जगभर लाखो बालमजुर (मुले आणि मुली) छोट्या-मोठ्या पातळीवर चालणा-या मत्स्योद्योग, जहाजबांधणी आणि संबंधित प्रक्रिया उद्योगांत काम करतात. कामाच्या ठिकाणी अतिशय गलिच्छ वातावरण असते. सुरक्षेचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत. रात्रंदिवस घाणेरडा वास, विषारी रसायने आणि वायूंच्या सहवासात राहिल्याने ही मुलं अकाली खंगू लागतात. शरीराची वाढ पूर्णपणे न झाल्याने त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी पडते त्यामुळे ही मुलं जंतुसंसर्गाला चटकन बळी पडतात. मुलींची अवस्था तर अधिक भयानक आहे. त्यांना अशा परिस्थितीत शारीरिक क्षमतेपेक्षा अधिक कामे करावी लागतात शिवाय लैंगिक अत्याचारांची त्या शिकार बनतात. सागरी मासेमारीच्या काळात जहाजे कित्येक महिने समुद्रात असतात. अशा वेळी धट्ट्याकट्ट्या माणसांची अवस्था बिकट होते. तिथे या नाजुक मुलांची अवस्था काय होत असेल? ग्रामीण भागातील गरीब घरांतील मुलांना ही कामं नाईलाजानं करावी लागतात.


`एफएओ'चे फिशरीज आणि एक्वाकल्चर विभागाचे सहायक महासंचालक अरनी एम मथायसन यांच्या मते या ठिकाणी काम करणा-या बालमजुरांचे जगण्याचे मुलभूत हक्क हिरावले जातात. त्यामुळे त्यांचे शिक्षण, आरोग्य या बाबी फार दुरच्या आहेत. या मुलांची शारीरिक, मानसिक, सामाजिक अशी सर्व बाजूंनी पिळवणूक होते. यासंदर्भात कायदे अधिक कडक केले असून प्रत्येक देशांनी त्याचे गंभीरपणे पालन करण्याची गरज श्री. मथायसन यांनी व्यक्त केली.


जगभरात कृषी, पशुपालन आणि मत्स्योद्योगात १३० दशलक्षांहून अधिक बालमजुर आहेत. एकूण जागतिक बालमजुरांच्या प्रमाणात ही संख्या ६० टक्के आहे. मत्स्योद्योगात नेमके किती बालमजुर आहेत याचा नेमका आकडा नसला तरी ही संख्या मोठी असावी. कारण हा व्यवसाय सर्वसामान्यांच्या सहसा लक्षात येत नाही.


भारत जगात तिसरा
मत्स्योत्पादनात भारत जागतिक पातळीवर तिस-या स्थानावर आहे. ७५ हून अधिक देशांमध्ये भारतातून मासे व संबंधित उत्पादने निर्यात होतात. दरवर्षी हा उद्योग वाढतच आहे. युरोप, अमेरिका, कॅनडा आणि मध्य पूर्व आशियातील देश हे भारताचे प्रमुख ग्राहक आहेत.