आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळावर अखेर पाणी सापडले!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - मंगळावर गेलेल्या नासाच्या रोव्हर क्युरिऑसिटीने या लाल ग्रहाच्या पृष्ठभागावर पाणी असल्याचा शोध पहिल्याच नमुना विश्लेषणात लावला आहे, क्युरिऑसिटी आणि त्यावरील प्रयोगशाळेने मंगळावरील मातीचे नमुने घेतले होते. त्या नमुन्याचे विश्लेषण केले असून मंगळाच्या पृष्ठभागावरील मातीमध्ये ओलसर स्वरूपात अनेक टक्के पाणी असल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे.

हे नमुने तापवले असता पुरेशा प्रमाणात कार्बन डायऑक्साइड, ऑक्सिजन आणि सल्फरची संयुगे बाहेर फेकली जातात, असे नासाने म्हटले आहे. मंगळाच्या पृष्ठभागावरील मातीमध्ये मुबलक प्रमाणात पाणी हा क्युरिऑसिटीने केलेल्या पहिल्या माती नमुन्याच्या विश्लेषणाचा रोमांचक निष्कर्ष आहे, असे रिसिलर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटच्या शालेय विज्ञान शाखेच्या अधिष्ठाता लॉरी लेशीन यांनी म्हटले आहे. मंगळाच्या पृष्ठभागावरील 2 टक्के जमीन पाण्यापासून तयार झालेली आहे. हा एक महत्त्वाचा स्रोत तर आहेच, शिवाय तो उत्साह वाढवणाराही आहे, असे लेशीन म्हणाल्या. ‘मंगळावर जीव अस्तित्वात हेते काय?’ या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी रोव्हर क्युरिऑसिटी 6 ऑगस्ट 2012 रोजी मंगळाच्या पृष्ठभागावरील ग्लेन विवरात उतरले आहे.