आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्न न करता आई झाल्यास उत्पन्नाच्या दुप्पट दंड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- चीनमध्ये अविवाहित मातांवर प्रांतीय मसुद्यात मोठा दंड आकारण्यात आला आहे. यामुळे समाजाच्या विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मध्य चीनमधील वुहान शहरात हा दंड आकारण्यात आला आहे. प्रस्तावित कायद्याविरोधात स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला असल्याचे प्रसारमाध्यमांच्या वृत्तात म्हटले आहे.

वुहानच्या लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब कल्याण व्यवस्थापनाने अविवाहित मातांवर दंड आकारणी लादली आहे. विवाहित पुरुषापासून अपत्यप्राप्ती करणार्‍या मातांना या कक्षेत घेण्यात आले आहे. कुटुंब नियोजन आणि लोकसंख्या नियंत्रणासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. चीनमध्ये एक अपत्य धोरणाची कडक अंमलबजावणी केली जाते. या मुद्दय़ावर 7 जूनपर्यंत लोकांच्या प्रतिक्रिया स्वीकारण्यात येणार आहेत. या मसुद्याला मंजुरी मिळाल्यास नवा अधिनियम 2010 मधील अशाच पद्धतीच्या कायद्याची जागा घेईल. लोकांच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर वुहानचे आयुक्त दुरुस्ती अधिनियम मंजुरीसाठी पीपल्स काँग्रेसकडे सादर करतील, अशी माहिती कुटुंब नियोजन आयोगाच्या अधिकार्‍यांनी दिली. चीनमध्ये अविवाहित महिलांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 2011 च्या आकडेवारीनुसार महिलांच्या एकूण लोकसंख्येत अविवाहित माता 20 टक्के आहेत. विवाहबाह्य संबंधातून किती मुले जन्माला आली हे पाहण्याचा यामागे उद्देश आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होणे कठीण आहे, असे समाजशास्त्रज्ञ प्रो. युवान झिन यांनी सांगितले.

दोषींवर सामाजिक मदत शुल्क
अपत्य असणार्‍या अविवाहित महिलांना मागील वर्षाच्या सरकारी उत्पन्नाची दुप्पट रक्कम दंडापोटी द्यावी लागेल. चीनच्या कुटुंब नियोजन कायद्यानुसार कायदा मोडणार्‍यांना ‘सामाजिक मदत शुल्क’ भरावे लागते. सरकारी कर्मचार्‍यांनाही शिक्षेला सामोरे जावे लागते. दोषी व्यक्तीला मागील तीन वर्षांच्या उत्पन्नाच्या तिप्पट दंड भरावा लागतो.

मलेशियन भारतीयांच्या घटस्फोटांत वाढ
क्वालालंपूर- भारतीय वंशाच्या मलेशियन नागरिकांमध्ये घटस्फोटांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. भारतीयांमध्ये असाच ट्रेंड सुरू राहिल्यास गंभीर सामाजिक प्रश्न उद्भवतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरवर्षी भारतीय वंशाच्या नागरिकांचे 5000 घटस्फोट होतात. काही वर्षांपूर्वी हा आकडा केवळ 200 होता, असे तामिळ समाजाचे प्रमुख एस. व्ही. लिंगम यांनी सांगितले.