आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रॅगनवर शोककळा: पोल्ट्रीच्या अग्निकांडात चीनमध्ये 119 कामगारांचा कोळसा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिजींग- चीनमध्ये सोमवारी झालेल्या भीषण अग्निकांडात किमान 119 जणांचा जळून मृत्यू झाला. ही घटना ईशान्येकडील पोल्ट्री प्रकल्पात घडली. पोल्ट्रीला लागलेल्या आगीत 54 जण जखमी झाले असून या घटनेमुळे देश हादरला आहे.
जिलीन प्रांतातील मिशाझी येथील बायाँगफेंग पोल्ट्री कंपनीच्या प्रकल्पात सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास ही भीषण आग लागली. ही घटना घडली त्यावेळी पोल्ट्रीमध्ये किमान 300 कामगार काम करत होते. मृतांचा आकडा 119 वर पोहचला आहे. परंतु त्यात वाढ होण्याची भीती सूत्रांनी व्यक्त केली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच बचाव आणि मदत कार्याला सुरूवात करण्यात आली. परंतु काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. त्यात प्रकल्पातील महत्वाचा भाग भक्ष्यस्थानी आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्राणहानी झाल्याचा अंदाज आहे. सरकारी टीव्ही वाहिनी सीसीटीव्हीने या घटनेमागे इलेक्ट्रिक स्पार्किंगचे कारण असल्याचा अंदाज वर्तवला आहे. घटनेच्या सहा तासांपर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. परंतु आता मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सहा तासांपर्यंत अग्निशमन दलाचे कर्मचारी आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होते. अद्यापही घटनास्थळी काही कामगार अडकले असावेत, असा अंदाज आहे. या घटनेची चौकशी करण्याची मागणी आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांनी सरकारकडे केली आहे. दरम्यान, 2009 मध्ये सुरू झालेल्या पोल्ट्री कंपनीत एकूण 1200 कामगार आहेत. सोमवारची घटना दहा वर्षांतील आगीची सर्वांत भीषण घटना ठरली आहे.

आग आणि धुराच्या लोटात अनेकजण गुदमरले

प्रवेशद्वार बंद; ‘ते’ शंभर कामगार सुखरूप
आग लागल्यानंतर स्वत:चे प्राण वाचवण्यासाठी धावपळ सुरू झाली. परंतु त्या वेळी काम सुरू असल्याने नियमाप्रमाणे पोल्ट्रीचे प्रवेशद्वार बंद होते. त्याला कुलूप लावलेले होते. त्यामुळे कामगार सहजपणे बाहेर पडू शकत नव्हते. तरीही अनेकांनी जीव वाचवण्यासाठी धडपड केली. त्यात त्यांना यश आले. असे शंभर कामगार आग आणि धुराच्या लोटातून सुखरूप बाहेर पडू शकले.

विचित्र वासाने डोकेदुखीची नागरिकांची तक्रार
पोल्ट्रीमध्ये लागलेली आग दिवसभर सुरू होती. त्यातून काही तरी विचित्र प्रकारचा वास येत असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. डोकेदुखी होत असल्याची तक्रार काही नागरिकांकडून करण्यात आली.
कारण काय ?
शंभराहून अधिक कामगारांची शिकार करणाºया या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु प्रत्यक्षदर्शींच्या मते आग लागण्याअगोदर प्रकल्पातून स्फोटाचा आवाज आला होता. स्फोटाच्या या दाव्याला अद्याप सरकारी अधिकाºयांकडून दुजोरा मिळालेला नाही.

कुणी तरी म्हणाले, पळा..पळा..!
मी पोल्ट्रीच्या एका विभागात काम करते. तेथे शंभर कामगार असतात. पोल्ट्रीचे असे दोन विभाग आहेत. सकाळी कामाला सुरूवात झाली. त्यांना काही वेळातच कुणी तरी मोठ्याने ओरडले, पळा..पळा. म्हणून आम्ही लगबगीने बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करू लागलो. त्यात एकदा जोरात खाली पडले. आगीतून माझी सुटका झाली खरी परंतु त्यात शरीराला अनेक ठिकाणी भाजले आहे. त्यातून मागे वळून पाहिले तेव्हा आगीचे आकाशात जाणारे मोठे लोट दिसत होते.’’
-वँग फेंग्या, 44 वर्षीय महिला कामगार.