आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Five People Climbing On Tree Since Three Days In Indonesia Fear Of Tiger

इंडो‍नेशियात वाघांच्या भीतीने पाच जण तीन दिवसांपासून झाडावर मुक्कामी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँड अकेह - इंडोनेशियाच्या उत्तरेकडील बेटावर सुमात्रा प्रजातीच्या वाघांमुळे थरार निर्माण झाला आहे. काही वाघांनी वन क्षेत्रात आलेल्या पाच जणांचा जीवघेणा पाठलाग केला. त्यामुळे हे नागरिक झाडावर जीव मुठीत घेऊन तीन दिवसांपासून बसले आहेत आणि झाडाच्या पायथ्याशी काही वाघ गगनभेदी डरकाळ्या फोडत येरझारा करीत आहेत.


जंगल भागातील या थरारनाट्याच्या मुळाशी सूड भावना असल्याचे सांगण्यात येते. कारण या पाच जणांकडून वाघाच्या एका बछड्याची हत्या झाली. त्यांनी उद्यानात भटकताना जेवणासाठी जाळे लावले. त्यात हरणे पकडण्याचा त्यांचा इरादा होता. परंतु त्यात वाघाचे बछडे अडकले. ते पाहून काही वाघांनी एका 28 वर्षीय तरूणावर हल्ला केला. त्यात तो ठार झाला. त्यानंतर या वाघांनी या पाच जणांचा पाठलाग सुरू केला. त्यामुळे जीव मुठीत घेऊन हे लोक उंच झाडावर जाऊन बसले. तेथेच त्यांना राहून कसाबसा दिवस काढावा लागत आहे. काही तासांत वाघ निघून जातील असे वाटले. परंतु रविवारी त्यांना तीन दिवस झाले आहेत. बछड्याच्या हत्येमुळे संतापलेले वाघ त्या झाडाखालून हलण्यास तयार नाहीत. चार वाघ डरकाळ्या फोडत झाडाखाली येरझा-या घालत आहेत.


वास्तविक, इंडोनेशियात प्राणी आणि माणूस यांच्यातील संघर्षाच्या अनेक घटना घडतात. त्यात नेहमीच प्राण्याचा पराभव झाल्याचे पाहायला मिळाले आहे. परंतु या घटनेत काहीसे उलट चित्र असल्याने चिंता वाढली आहे. प्रशासनाने पाच जणांच्या सुटकेसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी 30 जण प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांना यश मिळवण्यासाठी आणखी दोन-तीन दिवस लागतील, असे सांगण्यात आले. जगात सुमात्रा प्रजातीच्या खुज्या वाघांची संख्या सुमारे 300 ते 400 एवढीच राहिली आहे.


सुगंधाचा मोह नडला
झाडावर अडकलेली पाच माणसे ल्यूसर नॅशनल पार्कमध्ये विशिष्ट सुगंधी वनस्पती शोधण्यासाठी गेली होती. ही वनस्पती अत्यंत महागडी आहे. उद्यानात अनेक हिंस्त्र प्राणी असतानाही त्यांनी वनस्पती मिळवण्यासाठी हा धोका पत्करला, असे जिल्हा पोलिस प्रमुख डिकी सोंडानी यांनी सांगितले.