आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळमधील पुरामुळे उत्तर प्रदेश जलमय; चार लाख लोक विस्थापित, तर 10 जणांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ/ काठमांडू - नेपाळमधील प्रमुख नद्यांना आलेल्या महापुराचा परिणाम उत्तर प्रदेशात दिसू लागला असून राज्यात सात जिल्ह्यांतील 500 हून अधिक गावे प्रभावित झाली आहेत. चार लाख लोक विस्थापित झाले असून 10 जणांचा मृत्यू झाला. नेपाळमध्ये दरडी कोसळून 85 जणांचा मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी, बलरामपूर, बहराईच, गोंडा, श्रावस्ती, बाराबंकी आणि फैजाबाद जिल्ह्यांतील गावे पुराने वेढली असून घाघरा, शारदा, शरयू, रापती, गंडक या प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. लखीमपूर खीरी आणि बहराईचमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. या भागातून 300 लोक बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती आहे.

नेपाळस्थिती भालूबंग, भैरहवा आणि कुसम प्रकल्पांतून पाणी सोडण्यात आल्याने रापती नदीला पूर आला. चिसापाणी बंधा-यातून पाणी सोडल्याने घाघरा नदीची पाणीपातळी वाढत चालली असून शरयू प्रकल्पांतही धोक्याच्या पातळीपर्यंत पाणी आहे. या प्रकल्पातून अडीच लाख क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे जवळपास असलेली 250 गावे पाण्याने वेढली गेली आहेत.

10 जणांचा मृत्यू, राज्यात 300 बेपत्ता
लष्कराची वाहने अडकली
उत्तराखंडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दरडी कोसळून 24 लोकांचा मृत्यू झाला. गंगोत्री महामार्गावर लष्कराची अनेक वाहने अडकून पडली असून ऋषिकेश-बद्रिनाथ महामार्गाचा गावांशी संपर्क तुटला आहे. मुख्यमंत्री हरिश रावत यांनी परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे म्हटले आहे. दरमयान, गृहमंत्री राजनाथसिंह यांनीही डेहराडूनला भेट देऊन माहिती घेतली.

नेपाळमध्ये 7 हजार घरे जमीनदोस्त
काठमांडू : नेपाळमध्ये दरडी कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 85 झाली आहे. अजूनही 139 लोक बेपत्ता आहेत. दरम्यान, नेपाळमधील प्रकल्पांतून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे उत्तर भारतात पूरस्थिती गंभीर होत चालली आहे.

बिहारमध्येही पूरस्थिती
पाटणा : बिहारच्या दरभंगा, पूर्व चंपारण आणि नालंदा जिल्ह्यांतील नद्यांची पाणीपातळी धोक्याच्या वर असून अनेक ठिकाणी बांध फुटल्याने वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहेत.

पुरामुळे काश्मीरमध्ये कुंपणाचे नुकसान
जम्मू : मुसळधार पावसामुळे जम्मू-काश्मीरच्या सेक्टरमध्ये सीमेवर लावण्यात आलेल्या तारांच्या कुंपणाचे नुकसान झाले. सुमारे 200 मीटर भागात नाल्यांच्या पुराचे पाणी साचले आहे. वैष्णोदेवी यात्रा मार्गावर दरडी कोसळून सात भाविक जखमी झाले आहेत.