आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Foreign Policy Important Than National Interest Salaman Khurshid

राजकारणापेक्षा परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रहित महत्त्वाचे - सलमान खुर्शीद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलंबो - तामिळनाडूतील राजकीय पक्षांचा विरोध झुगारत भारताचे परराष्‍ट्रमंत्री सलमान खुर्शीद बुधवारी चोगम (ब्रिटिश वसाहतीच्या अखत्यारीतील राष्‍ट्रकुल देशांच्या राष्‍ट्रप्रमुखांच्या) परिषदेसाठी येथे दाखल झाले. खुर्शीद यांनी भारत श्रीलंकेतील तामिळींच्या कल्याणासाठी बांधील असल्याचे सांगितले. भारत तामिळबहुल उत्तर श्रीलंकेतील विकासकामात सहभागी आहे. ही कामे करू नका असे कोणी म्हणत नाही. त्यामुळे श्रीलंका दौ-यास विरोध करणा-यांचे आश्चर्य वाटते, या शब्दांत खुर्शीद यांनी तामिळी राजकीय पक्षांना फटकारले.
खुर्शीद व परराष्‍ट्र सचिव सुजाता सिंग यांचे विमानतळावर स्वागत झाले. आपण द्विपक्षीय नव्हे तर बहुपक्षीय परिषदेसाठी आलो आहेत. त्यामुळे परिषदेनंतर भारत श्रीलंका सरकारसोबत तामिळींचे अधिकार व भारतीय मच्छीमारांवरील हल्ल्याचा मुद्दा चर्चिला जाईल, असे त्यांनी सांगितले. तामिळनाडूतील वाढता विरोध व त्या राज्यात कॉँग्रेस पक्ष एकाकी पडण्याची भीती लक्षात घेऊन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गेल्या शुक्रवारी कोलंबोचा दौरा रद्द केला होता. भारताने चोगम परिषदेवर बहिष्कार टाकण्याची मागणी करणारा प्रस्ताव तामिळनाडू विधानसभेत दुस-यांदा पारित करण्यात आला.
बुधवारी व गुरुवारी चोगम परराष्‍ट्रमंत्र्यांची बैठक होत असून शुक्रवारी परिषद सुरू होईल. चोगम परिषदेत सहभागी होण्याचे कसे समर्थन करणार, या प्रश्नावर खुर्शीद म्हणाले, परराष्‍ट्र धोरण व राष्‍ट्रहिताच्या दृष्टीने यात सहभागी होत असून राजकारणाचा त्याच्याशी संबंध नाही.
भारताचा श्रीलंकेतील विकासकामात सहभाग
आम्ही उत्तर श्रीलंकेतील तामिळींसाठी मोठ्या प्रकल्पात सहभागी आहोत. युद्धग्रस्त भागात 15 हजार घरे बांधून दिली जात आहेत. तिथे रस्ते, वीज व पायाभूत सुविधा दिली जात आहे. इथे आल्याशिवाय ही कामे कशी होणार? ही कामे करू नका, असे कोणी म्हणत नाही. या मागणीमागचा त्यांचा तर्क समजत नाही, असे खुर्शीद यांनी विशेष विमानात पत्रकारांना सांगितले.
सिंग यांच्या निर्णयाची श्रीलंकन मीडियात चर्चा
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या चोगम परिषदेत सहभागी न होण्याच्या निर्णयाची चर्चा श्रीलंकेतील प्रसारमाध्यंमामध्ये मोठ्या प्रमाणात झाली. येथील एका इंग्रजी दैनिकाने ‘बॉयकॉट’ शीर्षकाच्या लेखात श्रीलंकेतील मानवी हक्काच्या उल्लंघनामुळे कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हार्पर व मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी परिषदेकडे पाठ फिरवल्याचे म्हटले आहे.
सिंग तामिळींची भावना शांत करण्याच्या प्रयत्नात
चेन्नई । चोगमच्या पार्श्वभूमीवर तामिळींमध्ये निर्माण झालेला राग शांत करण्यासाठी केंद्र सरकारने श्रीलंकेत केलेल्या कामांची यादी प्रसिद्ध केली आहे. वृत्तपत्रांमध्ये त्यासंबंधीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारत सरकार श्रीलंकेतील तामिळींसाठीच्या प्रकल्पांमध्ये 2009 पासून सहभागी असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.