आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनपासून 2014 नंतर स्कॉटलंड स्वतंत्र होणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


लंडन - युनायटेड किंगडम या संघराज्यातून स्कॉटलंड वेगळा होणार आहे. 2014 नंतर त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याचे संकेत मिळाले आहेत. स्कॉटलंडला विभाजनानंतर आंतरराष्ट्रीय संघटनांचे सदस्यत्व मिळवण्यासाठी नव्याने अर्ज करावे लागतील, असे ब्रिटनने सोमवारी स्पष्ट केले आहे.

स्कॉटलंड वेगळा झाल्यानंतर त्या देशाला संयुक्त राष्ट्र संघ किंवा युरोपीय संघटनेचे सदस्यत्व मिळवावे लागेल. त्यानंतरच आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार स्कॉटलंडला हक्क मिळू शकतील. ब्रिटनचे पंतप्रधान कॅमरोन यांच्या कार्यालयाने 57 पानांचे वैधानिक मत जाहीर केले आहे. केम्ब्रिज विद्यापीठातील प्रोफेसर जेम्स क्रॉफर्ड आणि एडिनबर्ग विद्यापीठातील प्रोफेसर अ‍ॅलन बोएल यांनी त्याचा कायदेशीर मसुदा तयार केला आहे. त्यामध्ये स्वतंत्र स्कॉटलंडच्या वैधानिक दर्जासंबंधी मात्र अनेक प्रकारच्या अनिश्चितता दाखवण्यात आल्या आहेत. स्वतंत्र स्कॉटलंडच्या मागणीवर जनमत आजमावण्यात आले आहे. त्याद्वारे लोकांना काय वाटते, हे जाणून घेण्यात आले. त्यात 32 टक्के स्कॉटिश जनतेने स्वतंत्र देशाचे समर्थन केले आहे, तर नवीन देशाच्या स्थापनेला 47 टक्के नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. ब्रिटनला एकसंध ठेवा. देश चांगल्या प्रकारे वाटचाल करत आहे. मग त्याची फाळणी कशासाठी? असा सवाल कॅमरोन यांनी रविवारी एका कार्यक्रमातून उपस्थित केला.

ऑक्टोबरमध्ये करारावर स्वाक्षरी
स्वतंत्र देशाच्या निर्मितीसाठी स्कॉटलंडचे पहिले मंत्री अ‍ॅलेक्स सॅमंड आणि ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमरोन यांच्यात गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये करार झाला. त्यात स्कॉटलंडच्या निर्मितीला हिरवा कंदील दाखवण्यात आला होता.

आयर्लंडचा अनुभव
विसाव्या शतकात आयर्लंड ब्रिटनमधून स्वतंत्र झाला होता. त्या वेळी या देशाचे युरोपातील अनेक देशांबरोबरचे संबंध संपुष्टात आले होते. हा देश 1922 मध्ये वेगळा झाला होता.

वाटेवर काटे
स्कॉटलंडमधील नागरिकांनी स्वतंत्र देशाची कल्पना केली आहे; परंतु हा मार्ग सहज नाही. कारण 2014 नंतर देशाला संघराज्यासह युरोपातील सामायिक चलन पद्धतीमध्ये सहभागी होण्यासाठी नव्याने प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. युरोपीय संघटनेत दाखल होण्यासाठी आवश्यक असलेले निकष पूर्ण करावे लागतील, असे मत प्रोफेसर क्रॉफर्ड आणि बोएल यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे नवीन देशाच्या वाटेवर काटे आहेत, असे म्हणावे लागेल.

तारीख अनिश्चित
स्कॉटिश नॅशनल पार्टीने (एसएनपी) वेगळ्या स्कॉटलंडचा नारा बुलंद केला आहे. ब्रिटनमधील इतर राजकीय पक्षांनी मात्र त्याला पाठिंबा दिलेला दिसून येत नाही. एडिनबर्ग येथून स्कॉटलंडची मागणी लावून धरली जात आहे. अशा वेळी हा भूभाग वेगळा होणार असला तरी त्याची तारीख मात्र अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. केवळ 2014 च्या अखेरीस त्यावर अंतिम निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येते.

ब्रिटनचा महसूल बुडणार
ब्रिटनची फाळणी होऊन स्कॉटलंड अस्तित्वात आल्यानंतर त्याचा मोठा आर्थिक फटका ब्रिटनलाही बसणार आहे. कारण देशाचे एक महत्त्वाचे बंदर प्रस्तावित राष्ट्राच्या भूप्रदेशात येते. या बंदराचा वापर एका महत्त्वाकांक्षी अणुप्रकल्पासाठी केला जातो. त्याशिवाय स्कॉटलंड वेगळे झाल्यानंतर सागरी तेलापासून मिळणा-या मोठ्या महसुलावरही आधीच संकटात असलेल्या ब्रिटनला पाणी सोडावे लागणार आहे.