आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानमध्ये इंधनाची टंचाई; लोक हवालदिल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानात सध्या इंधनाची समस्या अत्यंत गंभीर बनली आहे. देशातील जवळपास सवळच मोठ्या शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक पेट्रोलपंप बंद असून लोक हवालिदल झाले आहेत. दरम्यान, जनतेचा रोष पाहून नवाज शरीफ सरकारने या टंचाईस जबाबदार असलेल्या काही अधिका-यांना बडतर्फ केले आहे.

पेट्रोल व इतर इंधनाच्या टंचाईला कंटाळून अखेर अनेक लोक रस्त्यावर उतरले आहेत. पंतप्रधान नवाज शरीफ यांनीही या टंचाईची गंभीर दखल घेत संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. सध्या देशभरात पेट्रोल टंचाई असल्याने रुग्णांचेही हाल होत आहेत. एका व्यक्तीने याबाबतचा अनुभव सांगितला.

तो म्हणाला, भावाला पहाटे रुग्णालयात दाखल करावयाचे होते. परंतु, गाडीत पेट्रोल नव्हते. शेवटी जागोजाग विनंती केली. मात्र, चढ्या दरानेच पेट्रोल घ्यावे लागले. पेट्रोलसाठी मुलतानमध्येही अनेक लोकांनी निदर्शने केली.

आपत्कालीन सेवांवर परिणाम
इंधनाच्या टंचाईमुळे पाकिस्तानातील अनेक आपत्कालीन सेवांवर गंभीर परिणाम झाला आहे. अनेक पंप बंद असून जेथे ते उपलब्ध आहे तेथे चढ्या दराने ते खरेदी करावे लागत आहे. या टंचाईवर सरकारकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने काळा बाजार करणारे विक्रेते आणि पंपचालक या माध्यमातून पैसा कमावत आहेत. लाहोर, फैसलाबाद, इस्लामाबाद, सियालकोट आणि मुलतान येथील अनेक पंपावर सोमवारी लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या.

देणी थकल्याने अडचण
पाकिस्तान स्टेट ऑईल कंपनीच्या मते गेल्या दोन आठवड्यांत कोणत्याही बंदरावर कच्च्या तेलाचे जहाज आलेले नाही. तेल कंपन्यांचे २१५ अब्ज रुपये देणे बाकी असल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. साधारणपणे दर १५ दिवसांनी क्रूड तेलाचे ६ ते ८ जहाज देशात येतात. प्रत्येक जहाजात ६५ हजार टन तेल असते.

दोघांची हकालपट्टी
पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या टंचाईचा ठपका ठेवून पेट्रोलियम सचिव आबिद सईद, उपसचिव नईम मलिक आणि पाकिस्तान स्टेट ऑईल कंपनीचे प्रमुख अमजद जानजुआ यांची हकालपट्टी केली आहे. देशाचे पेट्रोलियममंत्री शाहिद खाकन अब्बासी मात्र पदावर कायम आहेत. अब्बासी शरीफ यांच्या नजीकचे मानले जातात. दरम्यान, या टंचाई स्थितीत पेट्रोलचा काळा बाजार रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आदेश शरीफ यांनी दिले आहेत.