आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘गेट वे टू हेल’ म्हणजेच ‘नरकाचे प्रवेशद्वार’!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुर्कमेनिस्तानच्या मध्यभागी असलेल्या काराकुम वाळवंटातील हे आहे ‘गेट वे टू हेल’ म्हणजेच ‘नरकाचे प्रवेशद्वार’! हे नरकाचे प्रवेशद्वार म्हणजे नैसर्गिक वायूचा धगधगता अग्निकुंड आहे. तेव्हाच्या सोव्हिएत युनियनचे शास्त्रज्ञ 1971 मध्ये तेलसाठ्याच्या शोधात येथे आले होते. तेलसाठ्याच्या शोधात जमिनीला छिद्र पाडत असताना त्यांचे बोअरिंग मशीन अचानक एका भूमिगत गुहेमध्ये गडप झाले आणि खोल सरोवर तयार झाले. या सरोवरातून विषारी वायू बाहेर पडण्याची भीतीपोटी शास्त्रज्ञांनी ते पेटवून देण्याचा निर्णय घेतला. हा वायू लगेच जळून जाईल, असे त्यांना वाटले खरे, पण तेव्हापासून हे सरोवर सातत्याने धगधगत आहे.

>1971 मध्ये तेलाचा शोध घेताना निर्माण झाले नैसर्गिक वायूचे सरोवर.

>40 वर्षांपासून अखंड धगधगत आहे हा अग्निकुंड.

असे आहे सरोवर
70 मीटर व्यास
60 मीटर रुंदी
20 मीटर खोली

थोडीशी चूक भोवली
शास्त्रज्ञांनी तेलाच्या शोधात खोदलेल्या या छिद्राचे सरोवरात रुपांतर झाले आणि मोठ्या प्रमाणावर मिथेन वायू बाहेर फेकला जाऊ लागला. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला व पर्यावरणाला धोका पोहोचू नये म्हणून शास्त्रज्ञांनी सरोवर पेटवून दिले. काही दिवसात गॅस संपेल आणि आग विझेल हा शास्त्रज्ञांचा अंदाज चुकला.

जगातील सर्वात मोठे साठे
तुर्कमेनिस्तानमध्ये जगातील सर्वात मोठे तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे आहेत. 40 वर्षांपासून सातत्याने धगधगत असलेले हे सरोवर त्याचाच पुरावा आहे.

कसे पडले नाव?
स्थानिक रहिवाशांनीच या सरोवरातून सातत्याने बाहेर पडणारा वायू, पेटत्या ज्वाला आणि उकळता चिखल पाहता या सरोवराचे नामकरण ‘गेटवे टू द हेल’ असे केले आणि तेच जगभर प्रसिद्धही झाले आहे.

सरोवर बंद करणार कसे?
तुर्कमेनिस्तानच्या अध्यक्षांनी एप्रिल 2010 मध्ये या सरोवराला भेट देऊन हे नरकाचे प्रवेशद्वार बंद करण्याचे किंवा त्याचा प्रभाव कमी करण्याचे आदेश दिले खरे पण शास्त्रज्ञांना त्यावर अद्यापही उपाय सापडलेला नाही.