गाझा/ कैरो/जेरुसलेम - साधारण महिनाभरापासून सुरू असलेल्या
इस्रायल-हमास संघर्षातील गोळीबार आणि स्फोटांचे धमाके मंगळवारी शांत झाले. इजिप्तच्या मध्यस्थीने दोन्ही पक्ष 72 तासांच्या युद्धबंदीवर राजी झाले.
युद्धबंदी लागू होण्यापूर्वी इस्रायलने गाझामध्ये हमासचे 32 बोगदे नष्ट केले. याचा सूड घेण्यासाठी हमासने इस्रायलवर शंभरहून जास्त रॉकेट हल्ले केले. दरम्यान, इस्रायलचे जवान, रणगाडे आणि लष्करी वाहने माझातून माघारी फिरली. गरज भासल्यास लष्करी कुमक पुन्हा गाझावर पाठवली जाईल, असा इशारा इस्रायल लष्कराच्या प्रवक्त्याने दिला आहे. त्याआधी इजिप्तच्या मध्यस्थीनंतर दोन्ही पक्ष हल्ले रोखण्यासाठी तयार नव्हते. हमास आठ वर्षांपूर्वीची नाकेबंदी संपुष्टात आणण्यावर अडून आहे, तर इस्रायल हमासच्या संूपर्ण कारवायांचा नष्ट करू इच्छित होता.
पॅलेस्टिनींची पावले उद्ध्वस्त घराच्या दिशेने : 8 जुलैपासून सुरू झालेल्या इस्रायली हल्ल्यात जवळपास 5 लाख पॅलेस्टाइन नागरिक स्थलांतरित झाले आहेत. यातील बहुतांश लोक संयुक्त राष्ट्राच्या मदत छावणीत राहत होते. युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर हे लोक आपले संसारोपयोगी साहित्य घेऊन उद्ध्वस्त घरांमध्ये परतत आहेत.
गुगलचा बॉम्ब गाझा गेम
गुगलच्या अॅप स्टोअरमधून बॉम्ब गाझा नावाचा मोबाइल गेम काढून टाकला आहे. हा खेळ प्लेएफटीडब्ल्यूने विकसित केला होता.
फेसबुकवर हा अद्यापही उपलब्ध आहे. यामध्ये प्लेअर एक फायटर जेटमधून बॉम्ब टाकतो आणि हमासचे बंडखोर काळे मुखवटे घालून त्यांच्यावर क्षेपणास्त्र हल्ले करतात.
मुस्लिम मंत्र्याचा राजीनामा
ब्रिटन मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री सईदा वा रसी यांनी राजीनामा दिला आहे. सरकारच्या गाझा धोरणाच्या विरोधात राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले. वारसी हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य आहेत. त्या 2010 मध्ये ब्रिटिश कॅबिनेटच्या पहिल्या मुस्लिम मंत्री झाल्या होत्या. यानंतर त्यांना विदेश विभागात वरिष्ठ मंत्री करण्यात आले होते.
(फोटो : गाझापट्टीतील खान युनिस शहरात इस्रायली सैनिक सोडून गेलेल्या रणगाड्यांवर उभे राहून हमासचा ध्वज फडकवत जल्लोष करणारी मुले)