ढाका - पाकिस्तानविरुद्ध बांगला देशात १९७१ च्या काळात पेटलेल्या मुक्तिसंग्रामात झालेल्या नरसंहारातील प्रमुख दोषी जमात-ए-इस्लामीचे ६२ वर्षीय नेते मोहम्मद कमरुज्जमा यांची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली. गेल्या मे महिन्यात विशेष न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.
न्यायमूर्ती एस. के. सिन्हा यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यीय न्यायपीठाने कमरुज्जमा यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली. जमातचे प्रमुख मतीउर रहेमान निजामी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते मीर कासिम अली यांनाही याच प्रकरणात विशेष न्यायालयाने गेल्या आठवड्यातच फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. सोहागपूर गावात २५ जुलै १९७१ रोजी १६४ लोकांची सामूहिक हत्या झाली होती. यात मदत केल्याचा कमरुज्जमा यांच्यावर आरोप होता. जमात-ए-इस्लामीच्या ज्या तीन नेत्यांना फाशी सुनावण्यात आली ती प्रकरणे सर्वोच्च न्यायालयानेही कायमस्वरूपी निकाली काढली आहेत.
एकूण ३० लाख मृत्यू
बांगला देश मुक्तिसंग्रामात पाकिस्तानी लष्कर व बांगलादेशातील त्यांच्या समर्थकांनी सुमारे ३० लाख लोकांची कत्तल केली होती. पाकमधील तत्कालीन लष्करी राजवटीचा कट्टर समर्थक असलेल्या जमात-ए-इस्लामी या पक्षाच्या नेत्यांनी त्या काळात अनेक हत्याकांड घडवून आणले हाेते. बांगला देश मुक्त झाल्यानंतर या नेत्यांना अटक करून त्यांच्यावर खटले चालवण्यात आले.
आतापर्यंत ९ जणांना कठोर शिक्षा
बांगला देशात युद्धक गुन्ह्यांतील खटल्यांसाठी पंतप्रधान शख हसिना यांच्या सरकारने दोन विशेष न्यायाधिकरण स्थापन केले असून या न्यायाधिकरणांनी आतापर्यंत ९ जणांना फाशी तर दोघांना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. यापैकी जमातचे संयुक्त सरचिटणीस राहिलेले अब्दुल कादिर मुल्ला यांनाच आतापर्यंत फासावर लटकावण्यात आले असून दोन दोषी अमेरिका व ब्रिटनमध्ये आहेत.