आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दबंग’ गिलानी कोर्टात, सुनावणी 1 फेब्रुवारीपर्यंत तहकूब

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी आज सर्वोच्च न्यायालयात हजेरी लावून अवमान नोटिसीप्रकरणी स्वत:च बाजू मांडली. न्यायालयातील त्यांचा प्रवेश ही पाकिस्तानी राजकीय पटलावरील एक जबरदस्त नाट्यमय घटना ठरली. आसिफ अली झरदारी यांना राष्ट्राध्यक्षपदाचे सुरक्षा कवच आहे त्यामुळे त्यांच्याविरुद्ध सरकारने कारवाई केली नाही. न्यायालयाचा अवमान करण्याचा विचारही माझ्या मनाला शिवू शकत नाही, असा प्रभावी युक्तिवाद त्यांनी न्यायालयात केला. पंतप्रधान व्यक्तिश: न्यायालयात उपस्थित राहिल्यामुळे न्यायालयाने समाधान व्यक्त केले. या प्रकरणी पुढील सुनावणी 1 फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली असून उर्वरित सुनावणीप्रसंगी व्यक्तिश: हजेरी लावण्याची गरज नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
राष्ट्राध्यक्ष झरदारी यांच्याविरोधातील पैशांच्या अफरातफरीचे खटले पुन्हा सुरू करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या आदेशावर कारवाई करण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवून पंतप्रधान गिलानी यांना न्यायालयाने अवमान नोटीस पाठवली होती व गिलानींनी व्यक्तिश: हजर राहावे असे फर्मान काढले होते. त्यानुसार आज गिलानी स्वत: न्यायालयास सामोरे गेले. न्यायमूर्ती नासिर उल मुल्क यांच्या अध्यक्षतेखालील सातसदस्यीय पीठासमोर त्यांनी स्वत:च पाच-सात मिनिटे बाजू मांडली. 59 वर्षीय गिलानी यांच्यातर्फे नंतर बॅरिस्टर ऐतझाज एहसान यांनी युक्तिवाद केला. गिलानींच्या हजेरीबद्दल न्यायालयानेही समाधान व्यक्त केले. त्यांची उपस्थिती हीच कायदा सर्वश्रेष्ठ असल्याचे दर्शवते, अशा शब्दांत न्यायमूर्ती आसिफ खोसा यांनी प्रशंसा केली.
राष्ट्रीय समेट अध्यादेश ( एनआरओ) सन 2009 मध्ये रद्द केल्यानंतर झरदारी यांच्या विरोधात कारवाई सुरू करण्याचे सरकारने का टाळले, असा सवाल न्यायालयाने केला. त्या वेळी पाकिस्तानी घटनेचे राष्ट्राध्यक्षांना पूर्ण संरक्षण आहे. देशात तसेच परदेशातही राष्ट्राध्यक्षपदाला खटल्यातून सूट दिली आहे. घटनेतील तरतुदींप्रमाणेच वागणे सरकारला बंधनकारक आहे, असा युक्तिवाद गिलानींनी केला. व्हिएन्ना करारानुसारही स्वीस सरकारच कारवाई करू शकत नाही, असे बॅ. एहसान यांनी स्पष्ट केले.
कोर्ट रूम नंबर चार
गिलानींच्या न्यायालयातील हजेरीबद्दल पाकमध्ये प्रचंड उत्सुकता होती.गिलानींनीही आपल्या दबंग शैलीत आज या राजकीय नाट्यामध्ये रंग भरले.सर्वोच्च् न्यायालयाच्या परिसरात बुधवारी मध्यरात्रीपासूनच तीन टप्प्यात कडेकोट सुरक्षा कवच उभारण्यात आले होते. केवळ देशी-विदेशी 100 पत्रकारांना या परिसरात प्रवेश देण्यात आला होता. गिलानी स्वत:च ड्राइव्ह क रीत आपल्या पांढ-याशुभ्र लॅण्ड क्रुझरमधून न्यायालयात आले.त्या वेळी बरोबर 9 वाजून 25 मिनिटे झाली होती. त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री, पीपीपीच्या नेत्यांचा ताफा होता. गाडीतून उतरताच त्यांनी समर्थकांना हात हलवून अभिवादन केले व ते पाय-या चढून कोर्ट रूम नंबर चारमध्ये गेले. सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी न्यायालयाचे कामकाज सुरू झाले. ते सुमारे दीड तास चालले.