आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Give Chemical Weapons, Avoid War; America Put A Week Option To The Syria

रासायनिक शस्त्रे द्या, युद्ध टाळा; अमेरिकेची सिरियाला आठवडाभराची मुदत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - सिरियाने आठवडाभरात त्यांच्याकडे असलेली रासायनिक शस्त्रे सोपवली तरच लष्करी कारवाई टाळता येईल, असा निर्वाणीचा इशारा अमेरिकेने दिला आहे. दुसरीकडे रासायनिक हल्ल्याचे कारण पुढे करून सिरियावर हल्ला करणे किती गरजेचे झाले आहे, हे अमेरिकी नागरिकांना पटवून देण्यासाठी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. म्हणूनच त्यांनी मन वळवण्यासाठी आता प्रसारमाध्यमांचा हत्यार म्हणून वापर करण्यास सुरुवात केली आहे.


अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी लंडन येथील दौ-यात सिरियाने त्याच्याकडील रासायनिक शस्त्रे सुपूर्द केली तरच लष्करी कारवाई रोखता येऊ शकेल परंतु सिरिया तसे करण्याची शक्यता कमीच असल्याचे म्हटले आहे. लष्करी कारवाई हा सिरिया प्रकरणावर तोडगा नसल्याची उपरतीही त्यांना झाली खरी पण अमेरिकेची युद्धखोरवृत्ती अद्यापही कायमच आहे.


देशाच्या दीर्घकालीन सुरक्षेसाठी सिरियावरील हल्ला महत्त्वाचा आहे, असे ओबामा यांच्याकडून लोकप्रतिनिधींना सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याअगोदर रविवारी ओबामा यांनी डिनरला हजेरी टाळली. हे डिनर उपाध्यक्ष जो बिडन यांच्याकडून आयोजित करण्यात आले होते. डिनरला रिपब्लिकनच्या अनेक सिनेटर्सनी हजेरी लावली होती. त्यात लिंडसे ग्रॅहम, सुझान कॉलिन्स, सॅक्सबी चॅम्बलिस, बॉब कॉर्कर, केली अयोटे, डेब फिश्चर यांनी डिनरला हजेरी लावली होती. ओबामा यांनी सिरिया हल्ल्याचे गांभीर्य नागरिकांना पटवून देण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. राष्ट्राध्यक्षांच्या या पावलामुळे काँग्रेस व सिनेटमधील सदस्य ओबामा यांच्या विनंतीला मान देऊन सिरियावरील लष्करी कारवाईला मंजुरी देतील, असे सरकारचा होरा आहे. व्हाइट हाऊस काँग्रेस सभागृहाची सहज परवानगी मिळवेल, असा आत्मविश्वास ओबामा यांचे कार्यालयीन प्रमुख डेनिस मॅकडोन यांनी व्यक्त केला. गेल्या आठवड्यात डझनभर काँग्रेस सदस्यांसोबत आपली चर्चा झाली. यापैकी एकानेही गुप्तहेर यंत्रणेच्या दाव्याला फेटाळले नाही. राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद यांनी आपल्याच नागरिकांवर रासायनिक शस्त्रे वापरली. हा दावा त्यांनी मान्य केला, असे डेनिस यांचे म्हणणे आहे.


दरम्यान, अमेरिकेने लष्करी कारवाईला विरोध केल्याबद्दल सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद यांनी व्लादिमीर पुतीन यांचे आभार मानले आहेत. जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर सिरियाचे परराष्ट्रमंत्री वालिद अल-मौलीम व रशियाचे सेर्जिइ लावरोव्ह यांनी असाद यांचे आभार पोहोचवले.


पहिलीच वेळ
अमेरिकेतील आघाडीच्या सहा वृत्तवाहिन्यांना एकाच वेळी मुलाखती देण्याची ओबामा यांची ही बहुधा पहिलीच वेळ आहे. त्याचबरोबर त्यांनी या मुद्द्यावर अनेक लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करण्याचा कार्यक्रमही आखला आहे. त्यामुळे आगामी दोन दिवस ते हल्ला मोहिमेच्या प्रचारावर भर देताना दिसणार आहेत, हे स्पष्ट झाले आहे.


तर ‘दहशतवादाचा स्फोट’
सिरियावर लष्करी हल्ला करण्यात आला तर दहशतवादाचा स्फोट होऊ शकतो, असे भाकीत रशियाने केले आहे. सिरियासोबतच आजूबाजूच्या देशांना दहशतवादी कारवायांची झळ पोहोचेल, असा इशारा रशियाचे परराष्ट्रमंत्री सेर्जिइ लावरोव्ह यांनी दिला. सिरियन परराष्ट्रमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते.


नेमके काय करणार ?
सिरियावरील लष्करी कारवाईची अनिवार्यता मांडण्यासाठी खुद्द ओबामा यांनी मोहिमेची सूत्रे हाती घेतली आहेत. तेच या आखाड्यात उतरले आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे मंगळवारी ते मुलाखतींचा सपाटा लावताना दिसून येतील. सहा टीव्ही नेटवर्कला त्यांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. सरकारची सिरियावरील लष्करी कारवाईमागील भूमिका काय आहे, याचे स्पष्टीकरण मंगळवारी ऐकायला मिळेल.