वॉशिंग्टन - पाकिस्तान ते पॅरिसच्या रस्त्यांपर्यंत पसरलेल्या दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्याची भीष्मप्रतिज्ञा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केली आहे. अलीकडे भलत्याच फोफावलेल्या इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांच्या (इसिस) नायनाटाच्या उद्देशाने सैन्यबळ वापरण्यासाठी नवे युद्धविषयक अधिकार देणा-या विधेयकाला काँग्रेसने (अमेरिकेचे वरिष्ठ सभागृह) मंजुरी द्यावी, असे आवाहन त्यांनी बुधवारी केले. विशेष म्हणजे भारतातही इसिसची लागण होत आहे. यामुळे ओबामांच्या दहशतवादाविरुद्धच्या आगामी लढ्याला भारतीय दृष्टीने मोठे महत्त्व आहे.
भारत दौ-याच्या पार्श्वभूमीवर वार्षिक अभिभाषणात ओबामा म्हणाले, पाकिस्तानच्या शाळेपासून ते पॅरिसच्या रस्त्यांपर्यंत दहशतवाद्यांच्या क्रौर्याचा बळी ठरलेल्या लोकांसोबत आम्ही उभे आहोत. आम्ही अतिरेकी व त्यांच्या नेटवर्कचा सफाया करतच राहू. एकतर्फी कारवाई करण्याचा अधिकार सुरक्षित ठेवला आहे. राष्ट्राध्यक्षपदावर आरूढ झाल्यापासून अमेरिका व सहकारी देशांना धोका असलेल्या अतिरेक्यांविरुद्ध आम्ही अथकपणे कारवाई केलेली आहे. तथापि, याच दरम्यान अमेरिकेने अफगाणिस्तान व
इराकमधील अतिरेक्यांविरुद्धच्या युद्धातून अनेक धडेही घेतले असल्याची कबुली ओबामा यांनी दिली. या वेळी डेमोक्रॅट्सच्या ४० सदस्यांनी पिवळ्या रंगातील पेन्सिल उंचावल्या.
नवे अधिकार मांडणारे विधेयक, नव्या युद्धाकडे पाऊल
सैन्याऐवजी भागीदारीची भूमिका
अफगाणच्या सुरक्षा दलास आम्ही प्रशिक्षित केले असून त्यांनी आता धुरा सांभाळली आहे. दहशतवादविरोधी मोहीम राबवून अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला; परंतु मोठ्या प्रमाणात भूदल सैन्य पाठवण्याऐवजी आता इतर देशांसोबत भागीदारीची अमेरिकेची भूमिका आहे.
जगावर अधिराज्याचे मनसुबे
मॉस्को | जागतिक घडामोडींवर वरचष्मा ठेवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असल्याची टीका रशियाने केली आहे. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लावरोव म्हणाले की, ओबामांच्या अभिभाषणातून 'आम्हीच एक नंबर आहोत', हेच तत्त्व दिसते. मात्र ते कालबाह्य व सद्य:स्थितीत विसंगत असल्याचे ते म्हणाले.
एकजूट दाखवा
इराक, सिरियात अमेरिकी लष्कर इस्लामिक स्टेटला
आपली पाळेमुळे वाढवण्यापासून रोखत आहे. दहशतवादविरोधी मोहिमेत अमेरिका एकजूट आहे, हे जगाला दाखवून देण्यासाठी संसद सदस्यांनी अतिरेकी संघटनांविरुद्ध सैन्यबळाच्या वापरासाठी अमेरिकी सरकारला अधिकार देणारा प्रस्ताव मंजूर करावा, असे आवाहन ओबामा यांनी केले. इसिसने इराक आणि सिरियातील मोठ्या भूभागावर कब्जा केला आहे.
इराणबाबत पर्याय खुले
इराणवर नवे निर्बंध घालण्याचा तूर्त विचार नाही. वाटाघाटी सुरू आहेत. त्यात यश येण्याची चिन्हे दिसत नाहीत. प्रयत्न सुरू आहेत. इराणकडून आण्विक कार्यक्रम सुरू ठेवण्यात आला आहे. त्यामुळे इराणबाबत सर्व पर्याय खुले ठेवण्यात आले आहेत. इराणला रोखण्यासाठी सर्व पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो. त्यासाठी विशेषाधिकाराचाही वापर करेन, असे ओबामा यांनी स्पष्ट केले.
भारतात इसिसच्या संशयिताला १० दिवस कोठडी
हैदराबाद | इराक व सिरियात इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी भारत सोडण्याच्या बेतात असलेल्या सलमान मोहियुद्दीनला न्यायालयाने १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्याच्या चौकशीसाठी सायबराबाद पोलिसांनी सलमानच्या कोठडीची मागणी केली होती.