आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेत सध्या शस्त्रास्त्र बंदीसाठी जोरदार अभियान राबविले जात आहे. सँडी हूक एलिमेंट्री स्कूल, न्यू टाऊन कनेक्टिकटमध्ये 20 मुले आणि 6 कर्मचा-यांच्या हत्येनंतर राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ‘गन कंट्रोल’साठी (बंदूक नियंत्रण) कायदा बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती. ओबामांनी जानेवारीत कायद्यात बदल करण्यासाठी 23 आदेशांवर स्वाक्षरी केली. जर नवीन प्रस्तावांची अंमलबजावणी झाली तर बंदूक कायद्यात 1968 नंतर हे सर्वात मोठे बदल होतील.
फायर आर्म्सच्या वापराविषयीच्या सीमा निश्चित करण्यासाठी उपराष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना राष्ट्रीय अभियान राबविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ते नॅशनल रायफल असोसिएशन (एनआरए), पोलिस, गन कंट्रोल समूह, धार्मिक नेते, महापौर, शिक्षणतज्ज्ञ, उपचार समूहासह विविध संघटनांशी चर्चा करत आहेत. तसे अमेरिकेत बंदुकांवर नियंत्रण फार कठीण आहे. रिपब्लिकन पक्षाने बंदूक बाळगण्याच्या अधिकारावर कोणत्याही प्रकारच्या बंदीला नेहमीच विरोध केला आहे. पक्ष आपले मुख्य मुद्दे इतक्या सहजपणे सोडू शकत नाही. डेमोक्रॅटिक पक्षालाही मते गमावण्याची जोखीम स्वीकारावी लागेल. मागील 20 वर्षांपासून ते ही बाब टाळत आलेत. परंतु, काही रिपब्लिकन नेते मान्य करतात की, न्यू टाऊन हत्याकांडामुळे अमेरिकेतील बंदुकांच्या राजकारणात मूलभूत बदल होऊ शकतो.
जानेवारीच्या मध्यात टाइम-सीएनएनच्या सर्वेक्षणात 55 टक्के लोकांनी ‘गन कंट्रोल’ला पाठिंबा व्यक्त केला होता. 44 टक्के लोक त्याविरोधात होते. ओबामा पुन्हा राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर ‘गन लॉबी’ धास्तावलेली आहे. ‘एनआरए’चे अध्यक्ष डेव्हिड कीने मान्य करतात की, गन कंट्रोल समर्थकांकडे पहिल्यांदाच धन आणि समर्थकही आहेत. शस्त्रांवर बंदी घालण्याच्या समर्थनार्थ अनेक अब्जाधीशही पुढे आलेत. हिंसाग्रस्त लोक एकजूट होत आहेत. सोशल नेटवर्किंगचा आधार घेण्याची तयारी आहे. सेलिब्रेटीजची मदत घेतली जात आहे. बंदुकांवर अंकुश आणण्याच्या नवीन लढाईचे शस्त्रही नवे आहे. बायडेन म्हणतात, नागरिकांची इच्छा आहे की, आम्ही कारवाई करावी. न्यूयॉर्कचे महापौर मायकल ब्लूमबर्गच्या ग्रुप इंडिपेंडेंस यूएसएने जवळपास 54 कोटी रुपये खर्च केले. ब्लूमबर्गच्या सहकार्याने ‘अवैध बंदुकांविरोधात महापौर’ या गटाने बंदुकांच्या हिंसेने ग्रस्त समूहांवर आधारित जाहिरात अभियान सुरू केले आहे. ब्रेडी कॅँपेन नावाच्या ग्रुपने 50 लाख डॉलरची जाहिरात मोहीम सुरू करण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे ‘गन कंट्रोल’विरोधात जोरदार वातावरण निर्मिती होत आहे. ‘एनआरए’ने संसदेत आपली स्थिती अधिक बळकट केली आहे. सॅँडी हूकच्या घटनेनंतर त्याने अडीच लाख नवीन सदस्य बनवले आहेत. बायडेन टास्क फोर्स बनण्यापूर्वी एनआरएने एक जाहिरात प्रसिद्ध केली होती. ज्यात आपल्या मुलींसाठी शस्त्रास्त्रांसह तैनात अंगरक्षक तैनात केल्याबद्दल ओबामांची खिल्ली उडवण्यात आली होती.
फायर आर्म्सवर नियंत्रणाच्या प्रस्तावावर समर्थनासाठी संसद आणि सीनेटचा हिरवा कंदील मिळवून देण्यासाठी ओबामांना समर्थन मिळवावे लागेल. व्हाइट हाउसला अपेक्षा आहे की, ‘गन कंट्रोल’च्या समर्थनार्थ उठणारे आवाज राजकारण्यांचे लक्ष वेधतील. ओबामा म्हणतात, मी आणि बिडेन सर्वस्व पणाला लावू. परंतु, बदल केवळ अमेरिकी जनतेच्या मागणीवरच होईल. हा एक दीर्घ संघर्ष आहे; परंतु संघर्षाची ठिणगी पडली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.