पेशावर - पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या बोईंग पीके- 756 या विमानावर काल (मंगळवार) रात्री पेशावर विमानतळावर बेछुट गोळीबार करण्यात आला. बोईंग कंपनीचे विमान बाचा खान विमानतळावर उतरत असताना ही घटना घडली. या गोळीबारात एका प्रवाशी महिलेचा मृत्यू झाला असून दोन फ्लाइट क्रू मेंबर्स जखमी झाले आहेत.
पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे प्रवक्ते मशूद ताजवर यांनी एका वृत्त संकेतस्थळाला माहिती देताना सांगितले, की बोईंग पीके विमान हे सौदी अरबमधील रियाधमधून 196 प्रवाशांना घेऊन पेशावरकडे येत होते. विमान पेशावर विमानतळावर उतरत असताना त्यावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर विमान कराचीला जाणार होते. विमानतळाजवळ असलेल्या रहिवाशी भागातून हा गोळीबार करण्यात आला आहे.
गोळीबारात दोन फ्लाइट स्टीवर्ड्ससह एक प्रवासी महिला जखमी झाली होती. प्रवासी महिलेचा त्यानंतर मृत्यू झाला. विमानाच्या वैमानिकावरही गोळीबार करण्यात आला होता. परंतु, तो थोडक्यात बचावला. विमानाच्या इंजिनलाही गोळ्या लागल्या आहेत. एकूण सहा गोळ्या विमानावर फायर करण्यात आल्या.
या गोळीबारात मृत्युमुखी पडलेली महिला प्रवासी मुलीसह प्रवास करीत होती. या हल्ल्यातून ती बचावली असली तरी तिच्यावर प्रचंड मानसिक आघात झाला आहे, असे पाकिस्तान एअरपोर्ट अथॉरिटीचे अधिकारी महंमद किफायातुल्लाह खान यांनी सांगितले.
घटनास्थळाबद्दल किफायातुल्लाह खान म्हणाले, की मी जेव्हा गोळीबार झालेल्या विमानात प्रवेश केला तेव्हा एक महिला सीटवर लेटली होती. तिच्या शेजारी असलेली तिची सुमारे नऊ वर्षांची मुलगी प्रचंड रडत होती. 'मेरी मां मर गई हैं, मेरी मां मर गई हैं' असे ती म्हणत होती.
या घटनेने विमानातील प्रवासी प्रचंड घाबरलेले होते. गोळीबारामुळे विमानाला आग लागू शकते असे त्यांना वाटत होते. विमान उतरल्यावर काही प्रवासी लगेच विमानाबाहेर पडले.
पुढील स्लाईडवर बघा, घटनास्थळाची छायाचित्रे...
(सौजन्य : डॉन न्यूज)
(Image Source- Reuters)