आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'श्री\' हाफिज सईद \'साहेब\' पुन्‍हा बडबडले, म्‍हणे दहशतवादावर भारताची भूमिका दुतोंडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर- मुंबईवर झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍याचा मास्‍टरमाईंड जमात-उद-दावा या संघटनेचा हाफिज सईदला भारताचे गृहमंत्री लोकसभेमध्‍ये 'श्री' म्‍हणून आदरार्थी उल्‍लेख करतात. तर सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस दिग्विजय सिंह हे त्‍याला 'साहेब' म्‍हणतात. परंतु, त्‍याच हाफिज सईदने भारताविरोधात पुन्‍हा गरळ ओकली असून शिंदेच्‍या वक्तव्‍याचा पाकिस्‍तानने पुरेपुर वापर करुन घ्‍यावा आणि संयुक्त राष्‍ट्रसंघामध्‍ये भारताविरुद्ध आवाज उठवावा, असा सल्‍ला दिला आहे.

शिंदे यांनी काल कॉंग्रेसच्‍या चिंतन शिबिरात भाजप आणि आरएसएसवर आरोप केला होता. भाजप आणि संघाच्‍या शिबिरात हिंदू दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जाते, असे शिंदे बोलून गेले. परंतु, त्‍याचा वक्तव्‍याचा आधार सईदने घेऊन भारताविरुद्ध गरळ ओकली आहे. तो म्‍हणाला, पाकिस्‍तानी संघटना दहशतवादी कारवाया करतात, असा आरोप करणा-या भारताचा दुतोंडीपणा शिंदेच्‍या वक्तव्‍यावरुन उघड झाला आहे. भारताने नेहमी पाकिस्‍तानविरुद्ध ओरड केली आहे. परंतु, आता त्‍यांचाच खरा चेहरा समोर आला आहे. भारताने आम्‍हाला मुंबई हल्‍ल्‍यात दोषी ठरविण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु, न्‍यायालयात एकही मुद्दा सिद्ध झाला नाही. आता भारतालाच दहशतवादी राष्‍ट्र घोषित करावे, यासाठी पाकिस्‍तानने संयुक्त राष्‍ट्रसंघात आवाज उठविला पाहिजे, असेही तो म्‍हणाला.

लक्षात असू द्या, याच हाफिज सईदच्‍या डोक्‍यावर अमेरिकेने 50 कोटी रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. तसेच तो वारंवार भारताविरुद्ध भडकाविणारे चिथावणीखोर वक्तव्‍ये करीत आला आहे.