कराची - 2008 मधील मुंबई हल्ल्यांचा मास्टरमाइंड जमात- उद - दावाचा प्रमुख हाफिज मोहंमद सईदने भारत-पाकिस्तान सीमेवरील गावांचा दौरा केल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. हाफिज सईदने सिंध प्रांतातील इस्लामकोट, मीरपूर खास, मिठी, खेरपूर परिसराचा दौरा केला असून ही गावे राजस्थानमधील जैसलमेर सीमेच्या दक्षिण-पश्चिम तनोत परिसरात आहेत.
गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, जमात- उद- दावाचा म्होरक्या महिनाभरापासून राजस्थान आणि गुजरातच्या सीमेवर लक्ष ठेवून आहे. सईद हा भारताला मोस्ट वाँटेड दहशतवादी आहे. बीएसएफच्या मते, या परिसरात तो दहशतवादी छावणी उभारण्याच्या प्रयत्नात आहे. सईद हा भारताचा तीव्र विरोधक असून भारताच्या इशार्यावरूनच अमेरिकेने नजीर अहमद चौधरी आणि मोहंमद हुसेन गिल या दहशतवाद्यांवर बंदी घातल्याचा त्याचा दावा आहे. यापूर्वीही कराची विमानतळावरील हल्ल्याला त्याने नरेंद्र मोदींच्या संरक्षण पथकास जबाबदार धरले होते. मात्र, या हल्ल्याची जबाबदारी तहरिक ए तालिबानने स्वीकारली होती.
सईदला हवीत हिंदू मुले
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मिठी, बिटाला आणि इस्लामकोट या परिसरात शुक्रवारी सईद दिसला असून तेथील हिंदू कुटुंबीयांना तो आपली मुले या छावणीत पाठवण्याचे आवाहन करत होता. शनिवारीदेखील त्याच सीमेवरील काही गावांत सईद दिसल्याची माहिती मिळाली आहे.
(फोटो - हाफिज मोहंमद सईद)