न्यूयॉर्क - व्हिसामध्ये चुकीची माहिती दिल्याप्रकरणी अमेरिकेतील भारतीय वाणिज्य वकिलातीतील माजी उपउच्चायुक्त देवयानी खोब्रागडे (39) यांच्याविरुद्धचा खटला चालूच राहील. यासंबंधी आणखी पुरावे जमा करण्यात आले असून ते सादर करण्यासाठी 13 जानेवारी ही अंतिम मुदत असल्याचे अमेरिकी सूत्रांनी सांगितले.
भारतीय महिला नोकराबद्दल चुकीची माहिती दिली आणि तिला अमेरिकी कायद्याने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा कमी वेतन दिल्याप्रकरणी देवयानी यांना गेल्या 12 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यांची अंगझडतीही घेण्यात आली होती. यावरून भारताने प्रचंड नाराजी व्यक्त केली. तसेच देवयानी यांच्याविरुद्धचा खटला मागे घेण्यात यावा, अशी मागणीही केली होती. मात्र, भारताने व्यक्त केलेल्या नाराजीचा अमेरिकेवर तसूभरही परिणाम झालेला नाही. या प्रकरणी अमेरिकेने खेद व्यक्त केला असला तरी माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला आहे.