चीनमध्ये महापूर २१ ठार. वीज, दूरसंचार सेवाही कोलमडली
पुराचे पाणी सुमारे ४५ हजार ५०० घरांत घुसल्याचे सांगितले जाते
-
बीजिंग- दक्षिण-पश्चिम चीनमध्ये आलेल्या महापुरामुळे हाहाकार उडाला आहे. या घटनेत २१ जण ठार झाले. या पुराचे पाणी ११ शहरांत घुसले असून, अडीच लाखांहून अधिक लोकांना याचा फटका बसला आहे. दरम्यान, सोमवारी आलेल्या पुरामुळे वाहतूक व्यवस्था, पायाभूत सुविधा कोलमडली असून शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. वॉग्मो भागाला या पुराचा तडाखा बसला आहे. येथील घरात पाणी घुसले असून काही वाहून गेले आहेत. यात २१ जणांचा मृत्यू झाल्याचे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले आहे. ३१ जण या घटनेत वाहून गेले आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे, असे उपराज्यपालांनी सांगितले आहे. जिआंगी परिसरातील पाच जण बेपत्ता झाले आहेत. ५२ जणांचा मृत्यू झाल्याचे घटनेनंतर सांगण्यात आले होते. यातील १४ जण जिवंत असल्याचे नंतर स्पष्ट करण्यात आले.
पुराचे पाणी सुमारे ४५ हजार ५०० घरांत घुसल्याचे सांगितले जाते. यामुळे घरांची पडझड झाली असून जवळपास १.३४ अब्ज यॉनचे (२०७ दशलक्ष अमेरिकन डॉलर) नुकसान झाले आहे. या घटनेत ८०१ घरांचे नुकसान झाले आहे. घरांबरोबरच शेतीलाही या पुराचा तडाखा बसला आहे. हजारो हेक्टर शेतीचेही नुकसान झाले आहे. पिके भुईसपाट झाली आहेत. वीज, पाणीपुरवठा, दूरसंचारसह अनेक सेवा कोलमडल्या आहेत. याशिवाय रस्ते, पूल, सिंचन सुविधा, हायड्रोपॉवर केंद्र यांचीही मोठी हानी झाली आहे. या पुरामुळे कालपासून सुमारे सहा हजार विद्यार्थी घरातच बसून आहेत.