आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा ‘हिंदी-चिनी भाई-भाई’चे गाजर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- दक्षिण आशियात चीनच्या वाढत्या प्रभावाबाबत चिंता व्यक्त होत असतानाच भारत आमचा स्पर्धक नसून भागीदार असल्याचे प्रतिपादन चीनच्या उपपरराष्ट्रमंत्री फु यिंग यांनी केले आहे. सार्क देशांमध्ये विभागीय दळणवळण प्रस्थापित होण्यासाठी दिल्ली आणि इतर सार्क सदस्यांना सहकार्य करण्याची भूमिकाही त्यांनी व्यक्त केली.
भूतान आणि नेपाळच्या नेत्यांशी चर्चा करून परतल्यानंतर एका चिनी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत यिंग यांनी दक्षिण आशियाबाबत चीनचे धोरण विशद केले. त्या म्हणाल्या की, भारत व चीनमधील संबंध गेल्या काही वर्षांत वेगाने सुधारले आहेत. सार्क देशांशी चीनचे संबंध सुधारले तरी त्याचा इतर देशांशी संबंधांवर काही परिणाम होणार नाही, असेही यिंग यांनी सांगितले. भूतान व नेपाळ यांचे भारताशी दृढ संबंध असल्याच्या पार्श्वभूमीवर भारत व चीनमध्ये डावपेच आणि स्पर्धेबाबत यिंग म्हणाल्या की, भूतान व नेपाळसह दक्षिण आशियातील सर्वच देशांशी चांगले संबंध ठेवण्याचा चीनचा प्रयत्न इतर कुठल्याही देशाच्या हितसंबंधांना बाधा पोहोचवणार नाही, तर दक्षिण आशियातील सर्वांच्याच प्रगतीसाठी हा प्रयत्न पोषक असेल. भारताशी सहकार्य वृद्धिंगत करण्यास चीन तयार आहे. जर चीन, भारत आणि दक्षिण आशियातील इतर देशांनी एकजुटीने क्षेत्रीय विकासामुळे निर्माण झालेल्या संधींचा फायदा घेतला तर आपसातील दळणवळणयंत्रणा विकसित होऊ शकते. चीनने आसियान (असोसिएशन आॅफ साउथ इस्ट एशियन कंट्रीज) देशांसाठी नुकताच आपला रेल्वेमार्ग खुला केला असून आसियानच्या दहा देशांमध्ये त्यामुळे व्यापारवृद्धीची शक्यता आहे. चीनची 4700 किलोमीटर सरहद्द सार्क देशांशी जोडलेली आहे आणि चीनची लोकसंख्या जगातील लोकसंख्येच्या अर्धी म्हणजेच 3 अब्ज आहे, असेही फू यिंग यांनी सांगितले.