आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hookah 'not Safe Alternative To Cigarette Smoking'

सिगारेटला हुक्क्याचा पर्याय घातकच!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - महाविद्यालयीन तरुणांमध्ये लोकप्रिय होत चाललेल्या हुक्क्यातून तंबाखूचे धूम्रपान करणे हा सिगारेटला हानीविरहित व सुरक्षित पर्याय नाही, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.

हुक्क्यातून तंबाखूचे धूम्रपान करणे हा सिगारेटला कमी हानीकारक पर्याय असल्याचा अनेकांचा गैरसमज आहे. सॅनफ्रान्सिस्कोतील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी हुक्का पिणा-यांच्या रक्त आणि लघवीतील रसायनांचे प्रमाण मोजून हुक्का पिणेही सिगारेट पिण्याइतकेच हानीकारक असल्याचा निष्कर्ष काढला आहे. हुक्क्याच्या धुरातून सिगारेटपेक्षा वेगळे घटक निघत असलेही तरी तेही विषारी असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. हुक्का पिणा-यांच्या शरीरातील कार्बनमोनाक्साइड व बेंझिनची पातळी मोठ्या प्रमाणात वाढते. हृदय विकार किंवा रक्ताभिसरणाशी संबंधित आजार असलेल्यांसाठी कार्बनमोनाक्साइड अत्यंत घातक आहे, तर बेंझिनमुळे ल्युकेमिया होण्याचा धोका असतो, असे सॅनफ्रान्सिस्को सामान्य रुग्णालय व ट्रामा सेंटरचे रसायनतज्ज्ञ पेयटॉन जेकब आणि तंबाखू संशोधक नील बेनोवित्झ यांनी म्हटले आहे.

दगडापेक्षा वीट मऊ हा गैरसमजच!
सिगारेट ओढण्यापेक्षा हुक्का पिणे त्यातल्या त्यात आरोग्यासाठी कमी हानिकारक असल्याच्या गैरसमजातून लोक दररोज वॉटर पाइप पिणे पसंत करू लागले आहेत. मात्र, वॉटर पाइप पिणे हा सिगारेट पिण्याला सुरक्षित पर्याय नाही किंवा आरोग्याचा धोका कमी करण्याचेही ते साधन नाही, असे जेकब म्हणाले.

पर्याय नव्हे चविष्ट व स्वादिष्ट विष!
हुक्क्यावाटे धूम्रपान करताना तंबाखूत फळे मिश्रित केलेला ओलसर धूर शरीरात जातो. त्याचा वास आणि चवही चांगली लागते. लाकडी कोळसा आणि तंबाखूतून निघणा-या विषारी धुरामुळे शरीरात रासायनिक प्रक्रिया होऊन विषारी बाष्पीकृत कार्बनी संयुगे (व्हीओसीएस) आणि पॉलिसायकलिक हायड्रोकार्बन (पीएएचएस) तयार होतात. काही पीएएचएसमुळे फुप्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका असतो.