आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीमंत नवरा कसा गटवाल? यासाठी चिनी महिलेचे क्लासेस, 87 हजार फी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- ‘आधी केले मग सांगितले’ या तत्त्वानुसार अब्जाधीशाशी विवाहबद्ध झालेल्या एका चिनी महिलेने श्रीमंत नवरा गटवण्यासाठी खास क्लासेस सुरू केले आहेत. सिचुआन प्रांतातील चेंगडू शहरात तिचा हा कोचिंग क्लास कुतूहलाचा विषय ठरला आहे. सू फेई असे या महिलेचे नाव आहे.
42 वर्षीय सू फेई केवळ विवाहाचे धडेच देत नाही तर श्रीमंत व्यक्तीची गाठ घालून देण्याची संधीही उपलब्ध करून देते. श्रीमंत लोकांना आकर्षित करण्याच्या प्रशिक्षणासाठी ती सुमारे 87 हजार रुपये ( 1570 अमेरिकी डॉलर्स) फीस आकारते. सध्या तिच्याकडे 12 विद्यार्थिनी श्रीमंत नवरा गटवण्याचे धडे गिरवत आहेत. सात वर्षांपूर्वी तिने शेनझेन, गुआँगडाँग प्रांतात हे क्लासेस सुरू केले होते. यामध्ये 100 उपवर तरुणी, महिलांनी प्रशिक्षण घेतले होते. हे वर्ग जोरात चालल्यामुळे तिने आता चेंगडू शहरात आपली शाखा सुरू केली आहे. श्रीमंत माणसांकडे कसे अ‍ॅप्रोच व्हावे, त्यांच्याशी कसे डेटिंग करावे, नात्याला अधिक गहिरेपणा कधी द्यावा एवढेच नव्हे तर महागडे गिफ्ट्स कधी घ्यावेत याबद्दल सू फेई इच्छुक तरुणींना मार्गदर्शन करतात.
श्रीमंत माणसांची आवड- धनाढ्य माणसांना शिक्षिका, डॉक्टर्स आणि शासकीय महिला अधिकारी आवडतात. तर हवाई सुंदरी, पत्रकार आणि दुकानदार महिला आवडत नाहीत, असे सू फेई यांचे निरीक्षण आहे. एखादा अब्जाधीश आपल्यासोबत दोन वर्षे फिरत असेल; परंतु विवाहाचे नावही काढत नसेल तर मग त्याची पत्नी होण्याचे भाग्य आपल्या भाळी नाही हे निश्चित, असे फेई म्हणतात.
वर्षभरात विवाह करा- भेटीगाठींवर नियंत्रण ठेवा. पहिल्या दोन महिन्यांत अधिक जवळीक, प्रेमाचा गहिरेपणा वाढवू नका. वर्षभराच्या आत लग्न करण्याची इच्छा असेल तर मर्यादित भेट घेणेच चांगले. फेई यांची शिष्या 44 वर्षीय क्वी हिने सांगितले की, धनाढ्य माणसाशी विवाहाची इच्छा असल्यास सू फेई यांचा क्लास खरोखरच उपयुक्त आहे. मी त्यांना दुप्पट फीस (सुमारे 1 लाख 75 हजार रु.) दिली होती. सू फेई यांच्या क्लासचे वैशिष्ट्य म्हणजे त्या देशभरात स्वयंवर आयोजित करतात. यामध्ये श्रीमंत, धनाढ्य लोक आपल्या जीवनसाथीची निवड करतात.
सू फेर्इंच्या खास टिप्स- श्रीमंत व्यक्तींचे छंद, ते नेहमी जातात अशी त्यांची आवडती ठिकाणे यांची आधी माहिती करून घ्या. आवडत्या ठिकाणी तुम्ही त्यांना ‘योगायोगाने’ भेटतोय असे भासवा. त्यांचे आणि तुमचे छंद अगदी सारखेच असल्याचे दाखवून द्या. पहिल्या भेटीवेळी आपली बसण्याची सीट अगदी काळजीपूर्वक निवडा. लाइट पाठीमागच्या बाजूने 30 ते 45 डिग्री अँगलमध्ये आपल्या चेह-यावर पडेल असे बघा. कारण त्यामुळे आपला चेहरा अधिक सुंदर दिसतो. सुरुवातीच्या काळात पंचतारांकित हॉटेलमध्ये सोबत गेल्यानंतर महागड्या पदार्थांच्या आॅर्डर देऊ नका. अगदी महागडे गिफ्ट घेण्याचीही घाई करू नका.