आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • If Attacked, It Will Defeat, Syrian President Challenges Western Conuntry

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हल्ला कराल तर पराभूत व्हाल, सिरियन राष्‍ट्राध्‍यक्ष असाद यांचे पाश्‍चात्त्यांना आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन / दमास्कस - सिरियात हल्ला करू पाहणा-या अमेरिका व ब्रिटनला घरगुती पातळीवर विरोधाचा मुकाबला करावा लागत आहे. त्यामुळे तूर्त तरी लष्करी कारवाईचा विचार नसल्याचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडून गुरुवारी स्पष्ट करण्यात आले. दुसरीकडे अमेरिकेने माघार घेताच सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशल अल-असाद यांनी पश्चिमेकडील देशांना हल्ला कराल तर पराभूत व्हाल, असे आव्हान दिले.


राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी लष्करी कारवाई करण्याच्या दस्तऐवजांवर अद्याप स्वाक्षरी केलेली नाही. रिपब्लिकन लोकप्रतिनिधी तसेच जनतेकडून काँग्रेसमध्ये या मुद्द्यावर सरकारला कडाडून विरोध होत आहे. त्यामुळे सरकारने अगोदर जनतेसमोर हा विषय स्पष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी ओबामा यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. अद्याप त्यावर अंतिम निर्णय घेतलेला नाही; परंतु रासायनिक शस्त्रे अशा प्रकारे वापरली जाऊ शकत नाहीत, असा आंतरराष्ट्रीय दंडक आहे. सिरियातील सरकारने हा नियम डावलला, असे ओबामा म्हणाले. ते पीबीएस न्यूज अवरला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. तिकडे ब्रिटन संसदेतही पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांच्या निर्णयालाही विरोध केला जात आहे. त्यांनीदेखील अमेरिकेला सहकार्य करण्याचे टाळले आहे. संयुक्त राष्ट्राचा अहवाल शनिवारी आल्यानंतर ब्रिटन व अमेरिका आपली भूमिका स्पष्ट करतील. अमेरिकेने माघारीची पताका दाखवताच सिरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी षड्डू ठोकला.


पुनरावृत्ती नको !
बशर अल-असाद यांच्या सरकारमुळेच गृहयुद्ध पेटले. त्यांच्याकडून रासायनिक अस्त्रांचा वापर करण्यात आला. परंतु पुन्हा अशा प्रकारचा हल्ला केला जाऊ नये. हीच गोष्ट असाद सरकारला वाचवणारी आहे, असे ओबामा यांनी स्पष्ट केले आहे.


हल्ले सरकारकडूनच
सिरियातील निष्पाप नागरिकांवर झालेले रासायनिक हल्ले बंडखोरांनी केले, हा दावा आम्हाला कदापि मान्य नाही. कारण ज्या पद्धतीने ते करण्यात आले आहेत ती लष्करी पद्धत व सफाई बंडखोरांकडे असूच शकत नाही. रॉकेटला डागण्याच्या पद्धतीचा आढावा घेण्यात आला. त्यात हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हल्ले सरकारनेच केले आहे, यात दुमत नाही, अशी अमेरिकेची भूमिका आहे.


‘हे तर संयुक्त राष्ट्राला आव्हान’
सिरियावर लष्करी कारवाई करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या विशेष अधिकारांस सरळ आव्हान देण्याचा प्रकार असल्याचा आरोप रशियाने अमेरिकेवर केला आहे. ही कृती आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करणारी आहे, याकडे रशियाच्या परराष्ट्र विभागाने लक्ष वेधले. संयुक्त राष्ट्राच्या तज्ज्ञ समितीने सिरिया दौ-यावर जाऊन तपासणी केली आहे. शुक्रवारी संयुक्त राष्ट्राची टीम न्यूयॉर्कला पोहोचणार आहे.


सिरियाला युद्धनौका मिळणार
रशियाने सिरियाला मदतीचा हात पुढे केला आहे. सागरी हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी सिरियाला युद्धनौका देण्यात येणार आहे. काही दिवसांत ती सिरियन सागरी क्षेत्रात दाखल होईल. हवाई हल्ल्याला परतवून लावण्यासाठी क्षेपणास्त्रवाहू जहाजदेखील पाठवण्यात येणार आहे. दरम्यान, इराण, फ्रान्स, रशियाने एकत्र येऊन सहकार्याचा हात पुढे केला आहे.


संयम ठेवा
सर्वांनी संयम ठेवला पाहिजे. सिरियाचे पेच राजकीय मार्गाने निघू शकेल. इतर देशांतील लष्कराच्या सहभागाने सिरियातील परिस्थिती आणखी चिघळू शकेल.’’
वाँग यी, परराष्ट्र मंत्री, चीन.