आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • If You Want Cooperation Then Prohibition Releases, Ruhani Say To Western

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सहकार्य हवे असल्यास निर्बंध उठवा, इराणचे राष्‍ट्राध्‍यक्ष रुहानी यांची पाश्‍चात्त्यांना खडे बोल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बैरट - आमच्याकडून सहकार्य हवे असेल तर अगोदर देशाला सन्मानपूर्वक वागणूक द्या. देशावरील निर्बंध हटवण्यात यावेत, त्यानंतरच सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असे इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी पाश्चात्त्य देशांना हे खडे बोल सुनावले आहेत.


देशाच्या संसदीय अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी सोमवारी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. इराणला सन्मान हवा आहे. त्यानंतर आम्ही सकारात्मक प्रतिक्रिया देऊ शकू, असे म्हणताच संसदेत उपस्थित सदस्यांनी त्यांच्या वक्तव्याला जोरदार हसून प्रतिसाद दिला. 64 वर्षीय रुहानी यांनी परराष्ट्रमंत्री म्हणून जावेद जारिफ यांची नियुक्ती केली आहे. अहमदीनिजाद यांच्या कार्यकाळात देशाची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याचे मानले जाते. त्यामुळे आपण सर्वप्रथम त्याला सुधारण्याचा प्रयत्न करू, असे रुहानी यांनी स्पष्ट केले आहे. आपल्या भाषणात रुहानी यांनी आपल्या समर्थकांसह देशाच्या सर्व नागरिकांचे आभार मानले. सिरियासोबतच्या संबंधात कसलाही बदल होणार नसल्याचे रुहानी यांनी रविवारी झालेल्या एका बैठकीत स्पष्ट केले. ते म्हणाले, सिरियात बशर अल असाद यांच्या फौजा बंडखोर गटाचा मुकाबला करत आहेत. त्यांना आमचा पाठिंबा आहे. प्रत्येक आव्हानात त्यांना आमची सोबत असेल. दोन्ही देशांत अनेक वर्षांची मैत्री आहे. त्याशिवाय अनेक क्षेत्रांत भागीदारीदेखील आहे. 1979 मधील इस्लामी क्रांतीपासून सिरिया व इराण यांच्यातील संबंध दृढ झाले.


असाद इफ्तार पार्टीत
सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर असाद यांनी रविवारी सायंकाळी इफ्तारनिमित्त आयोजित पार्टीत सहभाग घेतला होता. ते अनेक दिवसांनंतर पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. देशाच्या लष्करी दिवसांनंतर असाद यांचे दर्शन होण्याची ही दुसरी वेळ आहे. राजकीय पातळीवरून दहशतवादाला हाताळता येणार नाही. त्याच्याविरुद्ध कडक भूमिका घ्यावी लागेल, असे असाद यांनी पार्टीत बोलताना सांगितले.


‘गांभीर्य असेल तर मैत्री’
इराणने आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर गांभीर्य दाखवले तरच त्या देशासोबत मैत्रीच्या अपेक्षेने पाहता येऊ शकेल, असे अमेरिकेने म्हटले आहे. इराणने आपली आंतरराष्ट्रीय जबाबदारी लक्षात घेतली पाहिजे. त्याचबरोबर अणू कार्यक्रमावरून आंतरराष्ट्रीय समुदायाला वाटणा-या चिंतेचाही विचार केला पाहिजे, असे अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे.


सुधारणावादी प्रतिमा
रुहानी अणू चर्चेतील महत्त्वाचे व्यक्ती म्हणून गेल्या तीन दशकांपासून जगाला परिचित आहेत. अणू मुद्द्यावरील त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. ते माजी राष्ट्राध्यक्ष महेमूद अहमदीनिजाद यांच्या तुलनेने अधिक उदारमतवादी मानले जातात. त्याच जोरावर त्यांनी देशात चांगला विजय मिळवला. रुहानी राष्ट्राध्यक्ष असले तरी धोरणात्मक निर्णय देशाचे सर्वोच्च् नेते अयातुल्ला खोमेनी यांच्यावर अवलंबून आहे.


भारत-इराण चर्चा लवकरच
प्रादेशिक जल व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या छाबाहार बंदरप्रकरणी भारत लवकरच इराणमध्ये आपले शिष्टमंडळ पाठवणार आहे. सागरी व्यापारी वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी इराणसोबत चर्चा केली जाणार आहे. शपथविधीच्या निमित्ताने इराण दौ-यावर असलेले उपराष्ट्रपती हामीद अन्सारी यांनी काही मुद्द्यावर चर्चा केली.