आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Imran Khan News In Marathi, Tahreek a Insaf, Pakistan, Divya Marathi

चर्चेचा प्रस्ताव इम्रान खानने धुडकावला, शरीफ यांना राजीनाम्यासाठी दिली 48 तासांची मुदत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानात नवाझ शरीफ सरकारविरुद्ध सुरू असलेल्या निदर्शनाने सोमवारी आणखी गंभीर वळण घेतले. पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ या पक्षाचे नेते इम्रान खान आणि अवामी तहरिकचे नेते ताहिल उल कादरी समर्थकांसह ही निदर्शने करत आहेत. यावर शरीफ यांनी दिलेला चर्चेचा प्रस्ताव दोन्ही नेत्यांनी धुडकावला असून शरीफ यांना राजीनाम्यासाठी 48 तासांची मुदत दिली आहे.
इम्रान आणि कादरी यांच्याशी घटनात्मक चौकटीत कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्याची आपली तयारी असल्याचे शरीफ यांनी म्हटले होते. मात्र, चर्चेसाठी प्रतिनिधीमंडळ नेमण्यात इम्रान यांच्या पक्षाने स्वारस्य दाखवले नाही. दुसरीकडे कादरी यांनी शरीफ यांचा चर्चेचा हा प्रस्ताव सपशेल धुडकावला.

पाकच्या सुरक्षेला धोका : इम्रान आणि कादरी यांनी चालवलेल्या या आंदोलनामुळे पाकिस्तानच्या सुरक्षेला धोका असल्याचे देशाचे गृहमंत्री चौधरी निसार यांनी म्हटले आहे. घटनात्मक मागण्यांवर या नेत्यांनी संसदेत चर्चा करायला हवी, असेही ते म्हणाले.

सरकारच्या समित्या : दोन्ही पक्षनेत्यांशी चर्चा करण्यासाठी शरीफ सरकार दोन समित्या नियुक्त करत आहे. या समित्यांमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश केला जाणार आहे.

विरोध भांडवलशाहीला : जोपर्यंत या देशात भांडवलदार आणि व्यावसायिक गबर होत जातील तोवर या देशाचे भवितव्य अंधारमय असेल, असे इम्रान म्हणाला. (नवाझ शरीफ यांचे नाव देशातील सर्वश्रीमंतांच्या यादीत आहे. इत्तेफाक ग्रुपचे ते मालक आहेत.)

कर भरणार नाही : इम्रान
शरीफ सरकारविरुद्ध आता सविनय कायदेभंग चळवळीची वेळ आली आहे. आम्ही वीज, पाणी किंवा अन्य कोणताही कर सरकारच्या तिजोरीत भरणार नाही, असा इशारा इम्रान यांनी दिला. सरकारला लष्कर बोलावण्याची वेळ मात्र येऊ देऊ नका, असा सल्ला इम्रानने समर्थकांना दिला. शरीफ यांनी राजीनामा दिला नाही आणि देशातील परिस्थिती चिघळली तर याची सर्वस्वी जबाबदारी शरीफ यांच्यावरच राहील, असेही इम्रानने म्हटले आहे.