आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इम्रान खानच्या रॅलीची पाक सरकारला धास्ती, इस्लामाबादेत ऑक्टोबरपर्यंत लष्कर तैनात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - माजी क्रिकेटपटू आणि तहरीक- ए-इन्साफ पक्षाचा नेता इम्रान खानच्या आंदोलनाची पाकिस्तान सरकारने चांगलीच धास्ती घेतली आहे. त्यामुळेच इस्लामाबादचे संरक्षण तीन महिन्यांसाठी सैन्याच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात गृहमंत्री निसार अली खान यांनी हा वादग्रस्त निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार 1 ऑगस्टपासून ऑक्टोबरपर्यंत राजधानीत सैन्य तैनात ठेवण्यात येणार आहे. देशाच्या राज्यघटनेतील कलम 245 च्या आधारे हा निर्णय घेतला आहे, असे स्पष्ट करून सरकारने त्याचे समर्थन केले आहे.
लष्कराच्या नागरी भागातील कारवाईबाबतचे हे कलम आहे. सैन्याच्या पाच तुकड्या राजधानीतील संवेदनशनील भागात तैनात करण्यात येतील. मार्गल्ला हिल्स, नॅशनल पार्क या भागात सैनिक सज्ज ठेवण्यात येणार आहेत. काही दिवसांपासूनच राजधानीतील सुरक्षेची जबाबदारी सैन्याकडे सोपवण्याच्या असल्याच्या हालचाली सुरू होत्या.
14 ऑगस्टला रॅली
पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफचे (पीटीआय) प्रमुख इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली 14 ऑगस्ट रोजी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाच्या दिवशी राजधानीत रॅली काढण्यात येईल. हे आंदोलन मोठ्या स्तरावर असल्याने कोणत्याही प्रकारचा धोका टाळण्यासाठी सरकारने ही खबरदारी घेतल्याचे सांगण्यात येते.